|Monday, April 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरच्या राजकारणात जाधव-नातूंचा असाही ‘सहकार’गुहागरच्या राजकारणात जाधव-नातूंचा असाही ‘सहकार’ 

आरडीसीच्या स्थलांतर कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव हे माजी आमदार डॉ.विनय नातू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना.

गुहागर / प्रतिनिधी :

राजकारणात एकमेकांचे कट्टर दुश्मन असलेल्या आमदार भास्कर जाधव व माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यातील रंगलेल्या गप्पा अन् चक्क आमदार जाधव यांनी डॉ. नातूंचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केलेला सत्कार पाहून कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतर कार्यक्रमात सहकाराचे हे नवे पर्व गुहागरवासियांना अनुभवास आले.

कार्यक्रम आरडीसीचा असला तरी आ. जाधव यांनी हीच संधी साधून आरडीसीवर निवडून आलेले तसेच दापोली अर्बन व चिपळूण अर्बन बँकेवर निवडून आलेल्या संचालक व पदाधिकाऱयांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला डॉ. नातू उपस्थित रहाणार नाहीत असा समज भाजपा कार्यकर्त्यांचा होता. मात्र या समजाला छेद देत डॉ. नातू यांनी कार्यक्रम सुरू असतानाच प्रवेश केला आणि आ. जाधव यांच्या कडेलाच डॉ. नातू विराजमान झाले. या दोघांमध्ये चांगल्या गप्पाही रंगल्या. एखाद्या जुन्या मित्राप्रमाणे सुरू झालेल्या या गप्पांनी उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वी गुहागरमधील कार्यक्रमात असे एकाच व्यासपीठावर हे दोघेही कधीही एकत्र आले नव्हते. मात्र ते या कार्यक्रमात एकत्र दिसून आले. त्यातच या कार्यक्रमात अशाप्रकारे एकमेकांजवळ मैत्रीपूर्ण चर्चा होईल असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनाही वाटले नव्हते.

तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांपैकी सर्वाधिक संख्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांचीच होती. अशातच आ. जाधवांनी सर्व संचालक व आरडीसीच्या पदाधिकाऱयांचा सत्कार केला. हीच संधी साधून सहकारातील नाते अधिक घट्ट करत त्यांनी डॉ. नातू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सहकाराच्या माध्यमातून नक्की गुहागरचे राजकारण कोणते, गुहागरच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला का, भविष्यात गुहागरचे राजकारण बदलते आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात घोंगावत आहेत.

Related posts: