|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विचित्र अपघातात तरुणाचा हकनाक बळीविचित्र अपघातात तरुणाचा हकनाक बळी 

जानवली : उभ्या असलेल्या एसटी व टेम्पोच्या मध्ये असलेल्या दुचाकीस्वाराचा बळी गेला.
जानवली  : लक्झरी बसचा लॉक झालेला दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उघडण्याचा प्रयत्न करताना नागरिक.   अनिकेत उचले

कणकवली : महामार्गावर कणकवली-जानवली येथे बुधवारी चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराला नाहक प्राण गमवावे लागले. तर दुचाकीस्वाराचा भाऊ गंभीर जखमी झाला. प्रवासी घेण्यासाठी महामार्गावर एसटी थांबल्याने दुचाकीस्वार एसटीच्या मागे थांबला होता. तर दुचाकीस्वाराच्या मागे आयशर टेम्पो थांबला होता. मात्र, त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱया लक्झरी बसने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की टेम्पो समोरील दुचाकीला धडकला व दुचाकी पुढच्या एसटीला मागाहून धडकली. धडकेत दुचाकीस्वार एसटीच्या खाली फेकले गेले. हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात सकाळी 9.30 वाजता जानवली पोस्ट ऑफिसनजीक घडला.

अपघातात मोटारसायकलवरील दीपक पांडुरंग राणे (35) हा जागीच ठार झाला, तर त्याचा सख्खा भाऊ संजय पांडुरंग राणे (42, दोन्ही रा. कुणकवण – गावठणवाडी, देवगड) हा गंभीर झाखमी झाला.

एसटी थांबल्याने रांगेत वाहने

एसटी बसचालक दशरथ शंकर रेडेकर व वाहक शिवाजी बाळकृष्ण सावंत (एमएच 14 बीटी 1411) हे जांभवडे-कणकवली बस घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते. जानवली-पोस्ट ऑफिसनजीकच्या बसथांब्यावर प्रवासी घेण्यासाठी बस थांबली. त्यामुळे मागाहून पॅशन प्रो मोटारसायकलने (एमएच07 2613) येणारे दीपक व संजय राणे हे बंधू थांबले. दुचाकीच्या मागून येणारा आयशर टेम्पोही (एमएच 14 ईएम 7063) थांबला. एसटी, दुचाकी व टेम्पो अशी तीन वाहने एकामागोमाग उभी होती.

    लक्झरी बसची जोरदार धडक

नेमक्या याच सुमारास मुंबईहून कणकवलीच्याच दिशेने भरधाव वेगात येणाऱया लक्झरी (एमएच 07. सी. 9559) ची आयशरला मागाहून धडक बसली. ही धडक एवढी तीव्र होती, की थांबलेला आयशर टेम्पो वेगाने पुढे जात दुचाकीवर धडकला. टेम्पोही दुचाकीवर एवढय़ा जोरात धडकला, की दुचाकी अक्षरश: बसच्या मागील चाकांच्या मोकळ्य़ा भागात खाली फेकली गेली. जोरदार धडकेमुळे लक्झरीचा दर्शनी भाग अक्षरश: चेपला गेला व लक्झरी तब्बल 50 फूट मागे येऊन थांबली. धडकेत एसटी, आयशर व मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. यातील आयशर टेम्पो हा पुण्याहून टाटा मोटर्सचे स्पेअरपार्ट घेऊन गोवा येथे जात होता.

                     हेल्मेटचे तुकडे होत दुचाकीस्वार ठार

मोटरसायकल चालवित असलेल्या दीपक याच्या डोक्यातील हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले होते. दीपक व संजय हे दोघेही बंधू मोटरसायकलसह एसटीच्या खाली फेकले गेले. दोघेही जखमी अवस्थेत विव्हळत होते. दीपक तर अक्षरश: तडफडत होता. अपघातातील वाहनांच्या धडकेत मोठा आवाज झाल्याने तेथील विलास साटम यांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दीपक व संदीप यांना बाहेर काढले. त्यानंतर पिंटय़ा जाधव व 108 रुग्णवाहिकेद्वारे दोघांनाही कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दीपक याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर संजयही गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजयचा हात व पाय प्रॅक्चर झाला आहे. संदीप याच्याकडे असलेली छत्री टेम्पोच्या पुढील चाकाच्या भागात अडकली होती.

                     घटनास्थळी रक्ताचा सडा

घटनास्थळावरील दृश्य भयावह होते. दीपकचे डोके बसवर आदळल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे महामार्गावर रक्ताचे थारोळे साचले होते. हे दृश्य पाहताना मदतीसाठी असलेल्या ग्रामस्थांच्याही अंगावर काटा उभा राहत होता.

                               प्रवासीही हादरले

अपघातप्रसंगी बस व ट्रव्हल्समधील प्रवाशांना क्षणभर काय घडले हेच कळले नाही. लक्झरी बसमधील प्रवाशांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्झरीचा दरवाजा लॉक झाल्याने प्रवाशांना खाली उतरता येत नव्हते. ग्रामस्थांनी लक्झरीच्या फुटलेल्या काचेच्या ठिकाणांहून शिडीच्या सहाय्याने प्रवाशांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरत होता. तर कटावणीच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. लक्झरीच्या समोरील काच फुटून महामार्गावर पडल्याने जखमींना मदत करताना यातील काच लागून काही जखमी झाले होते.

                         अपघातानंतर वाहतुकीची कोंडी

अपघातात कंटेनर, बस, ट्रव्हल्स अशी मोठी वाहने महामार्गावर असल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील मोरे, हवालदार सूर्याजी नाईक, वाहतूक पोलीस प्रकाश गवस आदी दाखल झाले. तर एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. नंतर काही वेळाने प्र. तहसीलदार भारतभूषण राजपूत अपघातस्थळी दाखल झाले.

                   लक्झरी, बसमधील प्रवाशांनाही दुखापती

उभ्या असलेल्या वाहनांना एमव्ही ट्रव्हल्सच्या लक्झरीची धडक बसल्याने एसटी व लक्झरीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. लक्झरीतील प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी घालमेल सुरू होती. अपघातानंतर जखमींना उपचाराला हलविण्यासाठी व मदतीसाठी संदीप सावंत, दामू सावंत, पप्पू राणे, संजय परब, नागेंद्र मेस्त्राr, राजू मेस्त्राr, हेमंत राणे आदींनी प्रयत्न केले.

                     लक्झरी चालकावर गुन्हा दाखल

अपघातस्थळाचा पंचनामा कणकवली पोलिसांनी केल्यानंतर लक्झरी बसचालक बोटीचंद रामप्रसाद राजभर (50, सुंदर गल्ली, विलेपार्ले-मुंबई, मूळ उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयशर टेम्पो चालक सिद्धनाथ आप्पासो गगनमाले (35, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील करीत आहेत.

              दुचाकीस्वाराचा हकनाक बळी

कुणकवण येथून दीपक व संदीप राणे हे दोन्ही बंधू कणकवलीला झाडे कापण्याची मशीन दुरुस्तीसाठी घेऊन येत होते. यातील दीपक हा हेल्मेट घालून दुचाकी चालवित होता. विशेष म्हणजे ‘ड्रायव्हिंग’ करताना एसटी थांबल्याने पुढे जाण्यासाठी कोणताही आततायीपणा न करता एसटीच्या मागे थांबून रस्ता मोकळा होण्याची दीपक वाट पाहत होता. मात्र, कोणतीही चूक नसताना दीपकचा मृत्यू कर्दनकाळ बनून वाट पाहत होता. दीपक अविवाहीत होता. त्याच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी आहे.

 

महामार्गावर असलेल्या एसटी थांब्यावर एसटी थांबविताना अनेकदा चालक बस रस्त्याच्या बाजूला थांबवित नाहीत. अक्षरश: महामार्गावरच एसटी बस थांबवतात. त्यामुळेही पाठिमागून येणाऱया वाहनांना त्रास होतो व काहीवेळा अशा घटनांमुळे अपघात होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

Related posts: