|Saturday, April 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘मी अत्रे बोलतोय’ महाराष्ट्राचे वैभव‘मी अत्रे बोलतोय’ महाराष्ट्राचे वैभव 

udhav

उद्धव ठाकरे यांचे कौतुकोद्गार

सदानंद जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई / प्रतिनिधी

मी आचार्य अत्रे यांना कधीच पाहिले नाही, पण सदानंद जोशी यांनी ‘मी अत्रे बोलतोय’ या नाटय़कृतीतून मला अत्रे दाखवले. हे पुस्तक महाराष्ट्राचे वैभव आहे, त्याची जपणूक केली पाहिजे, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. सदानंद जोशी लिखित ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाटय़संहिता पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी अमरहिंद मंडळ येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

आचार्य अत्रे आणि माझे आजोबा प्रबोधनकार यांची घनिष्ठ मैत्री होती. अत्रे-ठाकरे वाद झाले पण आजोबा आणि बाळासाहेबांनी अत्रेबद्दल कधीही अपशब्द काढला नाही. त्यांनी आमच्या मनावर अत्रे हे मोठे व्यक्तिमत्त्व आहे असे बिंबवले, असे ठाकरे म्हणाले.

अंगात येणे काय असते ते ‘मी अत्रे बोलतोय’ या नाटय़प्रयोगावेळी सदानंद जोशी यांच्याकडे पाहून अनुभवले. प्रत्यक्ष अत्रे त्यांच्या अंगात संचारायचे, अशी आठवण उद्धव यांनी सांगितली. जसे अत्रे परत होणे नाही तसेच सदानंद जोशी 10 हजार वर्षात घडू शकत नाही, असे गौरवोद्गार उद्धव यांनी काढले.

अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले. त्या पिढीने महाराष्ट्रातील मराठी माणसाला मुंबई मिळवून दिली. ही मंडळी दिल्लीसमोर कधीही झुकली नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

अत्रे आमच्या आयुष्यात आले नसते तर आम्ही या व्यासपीठावर उभे राहिलो नसतो. अत्रेंसमोर त्यांची भूमिका साकारणे हे फार मोठे धाडस होते, असे गंगाराम गवाणकर म्हणाले.

नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांनी या पुस्तकाला उदंड वाचक लाभो अशा शुभेच्छा दिल्या. एकपात्री प्रयोग करणे हे मोठे धाडसाचे काम असते ते सदानंद जोशी यांनी त्याकाळी करून दाखवले. त्यामुळे अशा कलाकृती जिवंत ठेवल्या पाहिजे, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले.

विसुभाऊ बापट, रामदास पाध्ये, सुरेश परांजपे, विकास सबनीस आदींचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. गंगाराम गवाणकर, जयंत सावरकरमनोहर जोशी, राजेंद्र पै, दीपक करंजीकर, श्रीराम दांडेकर, पुस्तकाच्या संपादिका शिबानी जोशी उपस्थित होते.

Related posts: