|Sunday, February 26, 2017
You are here: Home » क्रिडा » संघात रहाणे-रैना, ‘फोकस’ मात्र ऋषभ पंतवर!संघात रहाणे-रैना, ‘फोकस’ मात्र ऋषभ पंतवर! 

11spo-10-rishabh-pant

वृत्तसंस्था/ मुंबई

भारत अ-इंग्लंड यांच्यात आज (दि. 12) दुसरा सराव सामना खेळवला जाणार असून भारत अ संघात अजिंक्य रहाणे व सुरेश रैनासारखे स्टार खेळाडू असतानाही मुख्य फोकस नवोदित, युवा खेळाडू ऋषभ पंतवरच असणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी हा शेवटचा सरावाचा सामना आहे. या लढतीला सकाळी 9 पासून प्रारंभ होईल. भारत या लढतीत प्रामुख्याने नवोदित खेळाडूंवर भर देणार आहे. 

गतवर्षी कनिष्ठांच्या विश्वचषक स्पर्धेत उपजेत्या राहिलेल्या भारतीय संघात ऋषभ पंतचा समावेश होता. त्यावेळी त्याने अतिशय प्रभावी खेळ साकारला होता. रणजी हंगामातील पहिल्या सत्रात महाराष्ट्राविरुद्ध चेंडूमागे एक धाव या समीकरणाने त्याने 308 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. त्या खेळीत त्याने 9 षटकार व 42 चौकारांची जोरदार आतषबाजी केली. पुढे झारखंडविरुद्धही त्याने शतकी खेळी साकारली व या बळावर त्याला इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारताच्या टी-20 संघात स्थान लाभले आहे.

ऋषभ पंतला संधी मिळाल्याने धोनीचा उत्तराधिकारी कोण असेल, याचे उत्तरही मिळाले असल्याची चर्चा सध्या रंगली असून ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेंडू उत्तम उसळत असल्याने येथे ऋषभच्या यष्टीरक्षणाची उत्तम पारख होऊ शकते. अर्थात, ऋषभ पंतला झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनशी मोठी स्पर्धा करावी लागणार असून तो देखील आक्रमक फलंदाज म्हणून एव्हाना नावारुपास आला आहे.

मुंबईकर अजिंक्य रहाणे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात परतत असून वनडे मालिकेपूर्वी बहरात येण्यासाठी त्याचे प्रयत्न असणार आहेत. वनडे संघातील स्थान गमावलेल्या, पण, टी-20 संघात असलेल्या रैनाला येथे स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. विजय शंकर, परवेझ रसूल, दीपक हुडा व शेल्डॉन जॅक्सन यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू शर्यतीत असल्याने कोणत्याच अनुभवी खेळाडूला केवळ पूर्वपुण्याईच्या बळावर स्थान कायम राखता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

या लढतीत भारत अ संघाच्या गोलंदाजीची धुरा विनयकुमार, अशोक दिंडा व प्रदीप संगवानसह डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमवर असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ अष्टपैलू बेन स्टोक्स, यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो, स्पीडस्टार लियाम प्लंकेट या मुख्य खेळाडूंना संधी देईल. यापूर्वी पहिल्या सराव सामन्यातून त्यांना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडचा मुख्य फलंदाज जो रुट मात्र या लढतीतही खेळणार नाही, असे संकेत आहेत. रुट वैयक्तिक कारणामुळे भारतात उशिरा दाखल झाला असून येथून तो थेट पुण्याकडे रवाना होईल.

संभाव्य संघ

भारत अ : ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुरेश रैना, दीपक हुडा, इशान किशन (यष्टीरक्षक), शेल्डॉन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, विनय कुमार, प्रदीप संगवान, अशोक दिंडा.

इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, ऍलेक्स हॅलेस, लियाम प्लंकेट, अदिल रशिद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.

सामन्याची वेळ : सकाळी 9 पासून.

Related posts: