|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘कुठं नेऊन ठेवलीय ही जाहिरात?’‘कुठं नेऊन ठेवलीय ही जाहिरात?’ 

bjp logo

‘कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…’ही टीव्हीवरील जाहिरात बंद होणार; मात्र जाहिरातीच्या दुसऱया टप्प्याची होणार सुरुवात

मुंबई / प्रतिनिधी

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती भाजपच्या ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या जाहिरातीची. या जाहिरातीवरून काही जणांनी आक्षेपही घेतले होते. पण आता मात्र नागरिकच ‘कुठं नेऊन ठेवलीय ही जाहिरात?’ असा प्रश्न विचारणार आहेत. कारण प्रचार मोहिमेतूनच ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र हा जाहिरातीचा पहिला टप्पा होता आता दुसऱया टप्प्याला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे ही जाहिरात बंद केली असे भाजपतर्फे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोटय़वधी खर्च करून मतदारांना विधानसभेतही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाजपने ‘कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ही जाहिरात मोहीम सुरू केली. मात्र आता हीच मोहीम त्यांच्यावरच बूमरँग होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर या जाहिरातींचा गाशा गुंडाळण्यात आला आहे.

काही दिवसांपासून सोशल साईट्स, विविध मेसेंजरवर या जाहिरातींचे विडंबन सुरू झाले होते. जाहिरातींची मोठय़ा प्रमाणात खिल्लीही उडविली जात असल्यामुळे भाजपने ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु होती. मात्र ही नियोजनबद्ध मोहीम होती. या जाहिरातीची खिल्ली उडविली गेली म्हणून आम्ही ही मोहीम बंद केली नाही असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केले. दुसऱया टप्प्यामध्ये भाजपची सत्ता आल्यास भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल हे आम्ही दाखवणार आहोत. त्यामुळे जाहिरात बंद करणार असलो तरी त्यामागचे कारण वेगळे आहे असे उपाध्ये यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांमध्ये या मोहिमेवर जोरदार टीका केली होती. टीव्हीवर ही जाहिरात मोहीम झळकू लागल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर नकारात्मक चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकांवेळी ‘जनता माफ करणार नाही’ या भाजपच्या जाहिरात मोहिमेला चांगले यश मिळाले होते. मात्र विधानसभेसाठी खास तयार केलेल्या या जाहिरातींना असे यश मिळाले नाही. सर्वात पुढे महाराष्ट्र माझा, या राज्य सरकारच्या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ही मोहीम तयार करण्यात आली होती.

व्हॉट्स ऍपवर मोहिमेची सर्रास खिल्ली उडविण्यात आली होती. जाहिरात मोहिमेचे विडंबन करताना ते नकारात्मकतेकडे झुकणारे होते. ही निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा बलाढय़ पक्षांना एकही संधी सोडली नाही. ही जाहिरात म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे असा समज या पक्षांनी निर्माण केला होता.

Related posts: