|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » श्रावण मासात प्रख्यात कीर्तनकारांच्या कीर्तनांची पर्वणी!श्रावण मासात प्रख्यात कीर्तनकारांच्या कीर्तनांची पर्वणी! 

kirtan photos=1

प्रतिनिधी/ रत्नागिरी

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. कीर्तन सप्ताह 3 ते 9 ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.

3 ऑगस्ट रोजी आंजर्ले-दापोली येथील विजय निजसुरे यांच्या कीर्तनाने सप्ताहाचा शुभारंभ होईल. ‘बुलंद बुरूज’ या आख्यान विषयावर ते कीर्तन करतील. त्यांनी सन 2002 पासून कीर्तनाचा अभ्यास केला. आजपर्यंत त्यांची 387 कीर्तने झाली आहेत.

4 ऑगस्टला चिपळूणचे प्रसिद्ध कीर्तनकार महेश काणे हे ‘दत्तभक्त शेतकरी’ विषयावर कीर्तन करतील. संगीत विशारद, देवर्षी नारद, कीर्तन केसरी, कीर्तन विशारद, कीर्तन भास्कर या पदव्यांनी सन्मानित काणे हे आकाशवाणी मुंबईचे बी ग्रेड कलाकार आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये गेल्या 20 वर्षांत त्यांनी सुमारे दोन हजार कीर्तने केली आहेत. 5 ऑगस्टला देवरुखचे युवा कीर्तनकार हभप कुमार विष्णू भाटय़े यांचे ‘सुधन्वा चरित्र’ यावर आख्यान होईल. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण झाले. ते काही वर्षांपासून कीर्तनाचा व्यासंग उत्तमरित्या सांभाळत आहेत.

6 ऑगस्टला पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या शिष्या सौ. रेशीम मुकुंद खेडकर (मरकळे) यांचे ‘संत सावतामाळी’ या विषयावर कीर्तन होईल. 1999 पासून त्या कीर्तन शिक्षण घेत असून श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथे पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. युवती, गानकोकिळा, संगीत प्रमोदिनी या कीर्तनातील पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, लखनौ, कोलकाता, अहमदाबाद, बडोदा, ग्वाल्हेर, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथे त्यांनी 550 कीर्तन केली आहेत.

7 ऑगस्ट रोजी पुण्याच्या युवा कीर्तनकार हभप सौ. संज्योत संजय केतकर यांचे ‘महानंदा’ यावर आख्यान होईल. सौ. केतकर यांना बीए-संस्कृत ही पदवी प्राप्त असून तबलावादनाच्या पाच परीक्षा उत्तीर्ण आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार उद्धव जावडेकर, हभप भिडे, नारद मंदिर, पुणे येथे त्यांचे कीर्तनाचे शिक्षण झाले आहे. नारद मंदिराचा युवती कीर्तनकार हा पुरस्कार त्यांना प्राप्त त्यांनी आतापर्यंत 100 कीर्तन केली आहेत.

8 ऑगस्टला मिरारोड, ठाणे येथील कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचे ‘पार्थरथी हनुमान’ यावर कीर्तन होईल. सन 2003 ते 2006 पर्यंत अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर, मुंबई येथून हभप श्रीधर भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनालंकार हा पाठय़क्रम पूर्ण केला. गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजराथ येथे त्यांची 400 कीर्तने, प्रवचने झाली. 2008 मध्ये लंडन, 2010 मध्ये त्यांनी स्वित्झर्लंड येथे कीर्तने केली.

9 ऑगस्टला राजापूरचे कीर्तनकार दत्तात्रय रानडे हे ‘मानाची पालखी’ यावर कीर्तन करतील. ग्रंथ हेच गुरू समजून कीर्तन तरंगिणी शिरवळकर बुवांची पुस्तके व अन्य ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी कीर्तनविद्या आत्मसात केली. दत्तदास घाग, आफळेबुवा, रामचंद्र भिडे, नाना जोशी, पाटणकरबुवा, वीरकरबुवा यांना त्यांनी कीर्तनातील आदर्श मानले आहे.

कीर्तन सप्ताहाला ऑर्गनची साथ वाटद-खंडाळा येथील प्रसिद्ध वादक राजेंद्र भडसावळे, तबलासाथ कशेळी-राजापूर येथील वादक आनंद ओळकर करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व कीर्तनांचा लाभ कीर्तनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोशाध्यक्ष सौ. राधिका वैद्य व मंडळाचे सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.

 

Related posts: