|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमध्ये वर्षभरात 141 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये वर्षभरात 141 दहशतवाद्यांचा खात्मा 

मावळते लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2016 या वर्षात काश्मीरमध्ये तब्बल 141 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असून काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 2012 मध्ये 67 तर 2013 मध्ये 65 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्या तुलनेत 2016 मधील आकडा दुपटीपेक्षाही जास्त असल्याची माहिती जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी दिली. 43 वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती
दिली.

जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी निवृत्त होण्यापूर्वी शनिवारी अमर जवान ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर साऊथ ब्लॉक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी लष्करप्रमुखपदाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. देशासाठी बलिदान दिलेल्यांना मी सलाम करतो असे सांगून त्यांनी वन रँक वन पेन्शन लागू केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. तसेच भारतीय लष्कर आता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा निर्वाळाही दिला. देशविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगत त्यांनी सीमेवरील तणावाबाबतची माहिती
दिली.