|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान

मुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान 

रणजी चषक स्पर्धेतील उपांत्य सामने आजपासून, मुंबई संघात युवा फलंदाज पृथ्वी शॉ पाचारण

वृत्तसंस्था/ राजकोट

रणजी चषक कारकिर्दीतील 42 वे जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई संघाला आजपासून खेळवल्या जाणाऱया उपांत्य लढतीत तामिळनाडूचे कडवे आव्हान सर्वप्रथम पार करावे लागणार आहे. येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर ही लढत खेळवली जाईल. मुंबईने या महत्त्वपूर्ण लढतीसाठी अवघ्या 17 वर्षांच्या पृथ्वी शॉला पाचारण केले असून केव्हिन आल्मेडाला त्यांनी यापूर्वीच संघातून डच्चू दिला आहे.

अल्मेडाला या हंगामात एकदाच संधी मिळाल्यानंतर त्यात अपयशाचा सामना करावा लागला होता. त्या एकमेव लढतीत त्याने 9 व 1 अशा किरकोळ धावा केल्या होत्या. याशिवाय, हैदराबादचा दुसरा डाव सुरु असताना त्याने स्लीपमध्ये झेलही सांडला होता.

पृथ्वी शॉ हा सध्या 19 वर्षाखालील संघाचा सदस्य असून डिसेंबरच्या प्रारंभी लंकेत झालेल्या युवा आशिया चषक स्पर्धेत त्याने 5 सामन्यात 191 धावांचे योगदान दिले होते. 89 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. मुंबई संघाने यंदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत हैदराबादचा 30 धावांनी पराभव केला असून फलंदाजीच्या आघाडीवर मध्यफळीतील श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, कर्णधार आदित्य तरे व सिद्धेश लाड यांच्याकडून संघाला विशेष अपेक्षा असतील. अष्टपैलू अभिषेक नायरने यापूर्वी उपांत्यपूर्व लढतीत 100 धावात 9 बळी घेतले होते. त्यामुळे, त्याचे योगदानही मुंबईसाठी महत्त्वाचे ठरु शकते.

दुसरीकडे, तामिळनाडूचा संघ येथे मुंबईविरुद्ध या स्पर्धेत सलामीच्या लढतीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, त्याची परतफेड करण्यासाठी निर्धाराने इंच इंच रण लढवेल, अशी अपेक्षा आहे. कौशिक गांधी (60.50 च्या सरासरीने 726 धावा), अभिनव मुकूंद (62.63 च्या सरासरीने 689 धावा) व भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला दिनेश कार्तिक (60.36 च्या सरासरीने 664 धावा) यांच्यावर तामिळनाडूची प्रामुख्याने भिस्त असणार आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर अश्विन क्रिस्त, कृष्णमूर्ती विघ्नेश, टी. नटराजन यांनी कर्नाटकचा धुव्वा उडवताना मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे, मुंबई संघाने तामिळनाडूला कमी लेखून चालणार नाही, हे स्पष्ट मानले जाते.

संभाव्य संघ

मुंबई : आदित्य तरे (कर्णधार-यष्टीरक्षक), प्रफुल वाघेला, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू, तुषार देशपांडे, रॉयस्टन, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप, एकनाथ केरकर, पृथ्वी शॉ.

तामिळनाडू : अभिनव मुकूंद (कर्णधार), बाबा अपराजित (उपकर्णधार), अश्विन क्रिस्त, औशिक श्रीनिवास, कौशिक गांधी, बाबा इंद्रजीत, नारायण जगदीशन, दिनेश कार्तिक, कृष्णमूर्ती विघ्नेश, वॉशिंग्टन सुंदर, जे. कौशिक, एम. मोहम्मद, टी. नटराजन, रंगराजन, राहिल शाह, लक्ष्मेशा सुर्यप्रकाश.

झारखंडसमोर गुजरातचे आव्हान

नागपूर : झारखंड व गुजरातचे संघ पारंपरिकदृष्टय़ा बलाढय़ नसले तरी आजपासून येथे खेळवल्या जाणाऱया रणजी उपांत्य लढतीत ते जोरदार आव्हान प्रस्थापित करण्याची क्षमता राखून आहेत. गुजरातचा सर्वोच्च धावा जमवणारा प्रियंक पांचाळ व झारखंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज शाहबाज नदीम यांच्यात या लढतीच्या निमित्ताने जोरदार जुगलबंदी रंगू शकते.

गुजरात संघातर्फे प्रियंक पांचाळने या हंगामात 100 पेक्षा अधिक धावा जमवल्या असून त्याला समित गोहेलने पूरक साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने 359 धावांचा विश्वविक्रम रचला आहे, ते ही लक्षवेधी आहे. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा माईलस्टोन सर करण्यासाठी 400 पेक्षा कमी धावांची गरज असून तो या विक्रमाच्या दिशेने आगेकूच करु शकतो. इंग्लंडविरुद्ध अलीकडेच पार्थिवने कसोटीत पुनरागमन केले असून झारखंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याच्या निर्धाराने तो खेळपट्टीवर ठाण मांडण्याची क्षमता राखून आहे.

 या लढतीत त्यांना डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची मात्र उणीव जाणवू शकते. अक्षरला बोटाची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली असल्याने तो येथे खेळू शकणार नाही. यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह मात्र गुजरातसाठी बलस्थान असणार आहे.

दुसरीकडे, झारखंड संघाची भिस्त युवा डावखुरा फलंदाज इशान किशनवर असू शकते. किशनने या हंगामात 719 धावांची आतषबाजी केली असून त्यात दिल्लीविरुद्ध 273 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा प्राधान्याने समावेश आहे. हरियाणाविरुद्ध चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याने दिलेले योगदान देखील झारखंडसाठी विशेष महत्त्वाचे ठरले आहे. महेंद्रसिंग धोनी हजर राहिल्यास त्याचे पाठबळ देखील झारखंडच्या खेळाडूंना प्रेरक ठरु शकते.

Related posts: