|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » पीव्ही सिंधू-कॅरोलिना मारिन आज आमनेसामने

पीव्ही सिंधू-कॅरोलिना मारिन आज आमनेसामने 

प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेला आजपासून हैदराबादमध्ये प्रारंभ, स्पर्धेत 6 प्रँचायझींचा सहभाग

वृत्तसंस्था/ हैदराबाद

6 फ्रँचायझी संघांचा सहभाग असलेल्या बहुचर्चित प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेला आजपासून (दि. 1) थाटात प्रारंभ होत असून हैदराबाद हंटर्स व चेन्नई स्मॅशर्स संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले पीव्ही सिंधू व स्पेनची कॅरोलिना मारिन या दिग्गज बॅडमिंटनपटूंमध्ये स्पर्धेतील सलामीची लढत रंगणार आहे. स्पर्धेत सिंधू व मारिनसह जान ओ जॉर्गेन्सेन, सूंग जी हय़ून, किदंबी श्रीकांत, सायना नेहवाल, ली यिओंग डे, व्हिक्टर ऍक्सेल्सेन आदी 60 अव्वल खेळाडूंनी विविध प्रँचायझी संघातून सहभाग घेतला आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेची यंदा ही दुसरी आवृत्ती आहे.

स्पर्धेत डेन्मार्क, इंग्लंड, पोलंड, रशिया, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, मलेशिया या देशांमधील दिग्गज बॅडमिंटनपटू सहभागी होत असून हैदराबाद हंटर्स, चेन्नई स्मॅशर्स यांच्यासह अवधे वॉरियर्स, दिल्ली एसर्स, मुंबई रॉकेट्स, बेंगळूर ब्लास्टर्स हे प्रँचायझी आहेत. स्पर्धेत एकूण 8 ऑलिम्पिक पदकजेत्यांचा समावेश असून ते देखील यंदाचे ठळक वैशिष्टय़ ठरेल.

‘प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये जागतिक स्तरावरील एकापेक्षा एक अशा सरस खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याने या स्पर्धेत चुरस रंगणार, हे निश्चित आहे. या स्पर्धेत हैदराबाद हंटर्स संघाचे प्रतिनिधीत्व लाभणे, हा मी माझा सन्मान मानते. पूर्ण अनुभव पणाला लावून संघासाठी यश खेचून आणण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णजेती व वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनने यावेळी प्रतिपादन केले.

पीव्ही सिंधूने देखील या स्पर्धेच्या संरचनेची प्रशंसा केली. ‘खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी शक्य तितका अनुभव लाभणे महत्त्वाचे असते. सर्वोच्च मानांकित खेळाडूंविरुद्ध आपण सातत्याने खेळत राहिल्यास, त्याचा लाभ कुठे ना कुठे तरी होतच असतो. यामुळे आपल्या खेळात सुधारणा होतेच. शिवाय, ज्या उणीवा आहेत, कमकुवत बाजू आहेत, त्यात दुरुस्त्या करणेही शक्य होते’, असे ती म्हणाली. डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेल्सेला यंदा बेंगळूर ब्लास्टर्स संघाचे प्रतिनिधीत्व लाभले असून जान ओ जॉर्गेन्सेन दिल्ली एसर्स संघातून नशीब आजमावणार आहे.

स्पर्धेतील सलामीच्या लढतीतच पीव्ही सिंधू व कॅरोलिना मारिनसारखे दिग्गज आमनेसामने उभे ठाकत असून त्यानंतर 9 देशातील 60 पेक्षा अधिक अव्वल बॅडमिंटनपटू आव्हान प्रस्थापित करतील. या स्पर्धेतील जेत्यांना साधारणपणे 6 कोटी रुपयांचे इनाम दिले जाणार असून जागतिक स्तरावरील ही सर्वोच्च बक्षीस रकमेची स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे.