|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » आयसीसी गोलंदाजांच्या मानांकनात अश्विन-जडेजा अव्वल

आयसीसी गोलंदाजांच्या मानांकनात अश्विन-जडेजा अव्वल 

वृत्तसंस्था/ दुबई

रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दोन स्थानी विराजमान असून ताज्या कसोटी मानांकन यादीत भारतीय संघ अव्वलस्थानी कायम राहिला आहे. शनिवारी सदर मानांकन घोषित केले गेले. अश्विनने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही अव्वलस्थान कायम राखले असून रवींद्र जडेजाचे तिसरे स्थान देखील अबाधित राहिले.

भारताच्या दोन गोलंदाजांनी कसोटी मानांकनात पहिली दोन स्थाने संपादन करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी 1974 मध्ये डावखुरे फिरकीपटू बिशन सिंग बेदी व लेगस्पिनर चंद्रशेखर भागवत यांना असा पराक्रम करता आला होता.

कसोटी फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱया स्थानी राहिला असून या गटात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल राहिला आहे. पाकिस्तानी सलामीवीर अझहर अलीचे मानांकन तब्बल 10 अंकांनी सुधारले असून तो या मानांकन यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्यासाठी कारकिर्दीतील हे सर्वोत्तम मानांकन ठरले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत त्याने 205 धावांची नाबाद द्विशतकी खेळी साकारली होती. सांघिक गटात भारतीय संघ 120 गुणांसह अव्वलस्थानी राहिला असून ऑस्ट्रेलिया 105 गुणांसह दुसऱया स्थानी आहे.