|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंभू-म्हैसाळ योजनेसाठी भरघोस निधी देवू : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

टेंभू-म्हैसाळ योजनेसाठी भरघोस निधी देवू : मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

मराठा,धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, तासगाव कारखान्याबाबत लवकरच निर्णय,

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

दुष्काळी भागांना वरदान ठरलेल्या टेंभू आणि म्हैसाळ पाणी योजनांना निधीची कमतरता भासू देणार नाही येत्या दोन वर्षात या योजना पुर्ण करु, आणि या योजनेच्या माध्यमातून सुमारे 60 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणून दुष्काळी भागाचा चेहरामोहरा बदलू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवून मराठा व धनगर समजाच्या आरक्षणासाठी शासनाची सकारात्मक भूमीका आहे. तासगाव कारखाना जत तालुक्यातील 42 गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्याबाबत ठोस निर्णय सरकार घेईल अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली.

टेंभू-म्हैसाळ योजनेच्या कामांचे भुमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन ढालगांव येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस यांनी सांगली जिह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना स्पर्श करीत मेळाव्याला आलेल्या शेतकऱयांना पाण्याचे ठाम आश्वासन दिले.

गेली 15 वर्षे आघाडी सरकारने जनतेला फसवून राज्य केले. अनेक पाणी योजना रखडत ठेवल्या, त्यापैकीच टेंभू आणि म्हैसाळ योजना ही होय. स्व. वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ योजनेला जन्म घातला होता. पण गेले अनेक वर्षे हि योजना पूर्ण होऊ शकली नाही. मात्र युतीच्या काळात या योजनेने गती घेतली आणि आता हि योजना आम्हीच पूर्ण करु. खरे तर स्व. वसंतदादा पाटील यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. आणि यावर्षातच म्हैसाळ योजना पुर्णत्वाकडे नेऊ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मेळाव्यात दिला.

सिंचन योजनाबाबत काय घोटाळे झाले, हे जग जाहीर आहे. कुठे पैसा मुरत होता हे जनतेला माहित आहे. पण टेंभू असो किंवा म्हैसाळ असो या रखडलेल्या पाणी योजना हे शासन पुर्ण करेल या योजना 2019 पर्यंत पुर्णत्वाकडे नेण्यात येतील. योजना पूर्ण झाल्याकी सुमारे 60 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या पाण्याने दुष्काळी भागातील दैन्य आणि द्रारिद्र दूर करुन या भागाचे नंदनवदन करण्यात येईल अशी हमी ही मुख्यमंत्र्यांनी देऊन सिंचन योजनामधील पैसा आता इतरत्र मुरणार नाही, हा पैसा जनतेसाठीच खर्च करण्यात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागातील पाणी योजना पंतप्रधान सिंचन योजनांनमध्ये घालण्याची महत्वपुर्ण भुमीका खासदार संजयकाका पाटील यांनी घेतल्याने या योजनांसाठी एक हजार 649 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे योजना पूर्ण होणारच अशी खात्री देत मुख्यमंत्र्यांनी उपसा सिंचन योजना सोलर वर टाकण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. टेंभू योजनेचा पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही योजनाही सोलरवर टाकली जाणार आहे. या योजनेमुळे अग्रणी नदी बारामाही केली जाईल आणि घाटमाथ्यावरील घाटनांद्रे व तिसंगी या उपसा सिंचन योजनांचे काम येत्या चार महिन्यांत सुरु करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टेंभू योजनेसह अन्य पाणी योजनांचे पाणी शेतकऱयांना परवडत नाही, शिवाय वीजेचा खेळखंडोबा असल्याने शेतकऱयांनाही त्रास होतो त्यामुळे कृषी पंपांसाठी सोलर टाकून फिडर बसविण्यात येणार आहेत. या पुढच्या काळात ऊसाची शेती पाटाच्या पाण्यावर घेऊ नये ऊसासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर झाला पाहिजे. सुक्ष्म सिंचन पद्धतीमुळे शेतकऱयांचे उत्पादन वाढेल आणि त्यांच्या हातात चार पैसे पडतील. उत्पादन वाढले की शेतकऱयांच्या जीवनामध्ये आर्थिक पहाट उजाडेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हे सरकार शेतकऱयांच्या पाठीशी ठाम उभे आहे, गेल्या सव्वादोन वर्षात सुमारे वीस हजार कोटी रुपये शेतकऱयांना देण्यात आले आहेत.

ऊस शेती सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकरी, साखर कारखाना व सरकार एकत्रीत बसून गरज पडल्यास सुक्ष्म सिंचन पद्धतीसाठी सरकार सबसीडी द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी हमी देत मुख्यमंत्री म्हणाले, उत्पादकता वाढविण्यासाठी सरकार काही योजना हाती घेत आहे. शेतीत परिवर्तन घडविणे हे आमचे ध्येय आहे. इतकेच काय येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी ठामपणे काम केले जाईल.

जत तालुक्यातील 42 गावे म्हैसाळ योजनेत समाविष्ठ करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. याबाबत कर्नाटक सरकारशी बोलणी केली जाईल तेथील जनतेला ज्यावेळी पिण्याचे पाणी कमी पडते त्यावेळी महाराष्ट्र त्यांच्या मदतीला धावून जातो. खरे तर आमचा कर्नाटकाचा सीमावाद असेल पण पाणी प्रश्नांत हा वाद येणार नाही. आणि आम्ही सीमाभागातील गावे महाराष्ट्रात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.

बंद असलेल्या तासगाव कारखान्याच्या प्रश्नालाही मुख्यमंत्र्यांनी हात घालून तासगाव कारखाना सुरु करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आता सांगली जिह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिल्या.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हे सरकार सकारात्मक भूमीका घेत आहे. या दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. केंद्राकडे आरक्षणाबाबत ठोस पुरावे देण्याची प्रक्रिया चालू आहे. परंतू आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एक इंच ही जागा दिली नाही. पण आम्ही छ. शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करीत आहोत. महाराजांनी राज्यकर्ते हे जनतेचे सेवक आहेत, मालक नव्हेत अशी शिकवण दिली होती. त्यामुळे जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करु गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन झाले आहे. महाराजांचे हे स्मारक जगात एक आगळे वेगळे स्मारक असेल असे स्पष्टीकरण ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी करुन स्मारक समारंभ यशस्वी केल्याबद्दल महसूल चंद्रकांत पाटील यांचे खास अभिनंदन केले.

गेल्या सव्वादोन वर्षात सरकारने जनतेसाठी आणि शेतकऱयांसाठी भरीव कामगिरी केली आहे. ओबीसी साठी खास मंत्रालयाची स्थापना करुन ओबीसींच्या योजना या मंत्रालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यात येतील. येत्या पाचवर्षात सरकार सर्व ताकदीनीशी जनतेचे प्रश्न सोडवून पुन्हा आशिर्वाद मागण्यासाठी जनतेसमोर येईल असे सांगून येत्या जिल्हापरिषद निवडणूकात जनतेने आम्हाला आशिर्वाद द्यावा अशी हाक दिली.

खा. संजयकाका पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा नेता म्हणून गौरव केला. मोठय़ा संघर्षातून जनतेच्या पाठींब्यावर उभे राहिले आहे. काम करण्याची धमक आणि शक्ती या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे राज्यसरकार खा. संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल. जिह्याच्या विकासासाठी त्यांनी आणलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी राज्य सरकार कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवून खा. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला.

मागील सरकारने खोटी आश्वासने देवून जनतेला फसवले निवडणूका आल्या की जनतेला गुमराह करुन मते मिळवायची आणि सत्तेवर जायचे, मात्र जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करायचे असा धंदा या भागातील नेत्यांनी केला आहे. मात्र आपण जनतेची फसवणूक करणार नाही, लोकांचे काम करण्यात आनंद मानू, आपण गेले अनेक दिवस सत्तेची हाव न धरता समाजासाठी काम केले त्यामुळेच सांगली लोकसभा मतदारसंघातून दोन लाख 40 हजार मतांनी विजयी झालो हा ऐतिहासीक विजय देश कधीच विसणार नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला पाणी देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. पाण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोलाची साथ दिल्यानेच आज टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या रखडलेल्या कामांचे भूमीपूजन होत आहे. आपल्या आयुष्यातील हे मोठे काम असल्याचे उद्गार खा. संजयकाका पाटील यांनी काढले.

मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, टेंभू-म्हैसाळ योजनेला निधी द्यावा, म्हैसाळ योजनासुरु करण्यासाठी मुंबईत बैठक बोलवावी, जत तालुक्यातील 42 गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करावा, आरेवाडी बिरोबा बनातील पर्यटन क्षेत्रातील आराखडा मंजूर करावा, बेदाण हळद, मिर्ची करमुक्त करावीत, कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, तासगाव कारखाना सुरु करण्याबाबत ठोस पाऊले उचलावीत, जत तालुक्याचे विभाजन करावे अशा मागण्या खा. संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केल्या. आणि या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमीका घेतली. येत्या जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये सांगली जिल्हापरिषदेवर भाजपचा झेंडा फडकावू असा शब्द खा. पाटील यांनी आपल्या भाषणात दिला.

म्हैसाळ योजनेच्या अंकले व खलाटी या सहाव्या टप्यांसाठी शासनाने सुमारे 110 कोटी चा निधी द्यावा जत तालुक्याचे विभाजन तातडीने करावेत या तालुक्यासाठी अतिरीक्त तहसिलदारपद निर्माण करावे, म्हैसाळ मध्ये माडग्याळ समावेश करावा, रब्बी पिकांचे पंचनामे झाले आहेत त्याचे अनुदान द्यावे. जत तालुक्यात आतापासून दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून मागेल त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशा मागण्या जत चे आमदार विलासराव जगताप यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या तर येत्या जिल्हापरिषद निवडणूकीत या तालुक्यातील 9 पैकी 6 जागा जिंकू व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवू अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली.

आघाडी शासनाने दहा कोटी दिले असते तर पाच वर्षापुर्वीच पाणी आले असते परंतू ढालगांव विभागाला अनेक नेत्यांना सापत्नपणाची वागणूक दिली. टेंभू योजना पूर्ण झाली असती तर अर्धा तालुका जलमय झाला असता. पण ढालगांव विभागातील गोरगरीब जनतेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यानेच आपण खा. संजयकाका पाटील यांच्या पाठीमागे लागून टेंभूचे काम कवठेमहांकाळ तालुक्यात येण्यासाठी साकडे घातले. पाणी देण्याची धमक केवळ संजयकाका पाटील यांच्यातच आहे. ढालगांव विभागात टेंभूचे पाणी आले तर येथील जनता मुख्यमंत्री फडणवीस व खा. संजयकाका पाटील यांचे उपकार कधीही विसरणार नाही अशी भावना या विभागाचे नेते जि.म. बँपेंचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी आपल्या प्रास्ताविकात भाषणात व्यक्त केली.

ढालगांव विभागात गोरगरीब शेतकरी, मेंढपाळ व ऊस तोडणी करणारे मजूर राहतात या विभागात पाणी नसल्यामुळे भटकंती करण्याशिवाय व हमाली करण्याशिवाय गत्यंतर नाही. टेंभू योजनेचे पाणी आले की  हा भाग सुजलामसुफलाम होईल आणि पाणी आणण्याची किमया खा. संजयकाका पाटील हेच करु शकतात असेही चंद्रकांत हाक्के म्हणाले.

या शेतकरी मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. अनिल बाबर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दिपकबाबा शिंदे, वैशाली पाटील, औंदुबर पाटील, जनार्दन पाटील, आकाश कोळी, प्रकाश जामदाडे, हायुम सावनुरकर, अनिल शिंदे, दादासाहेब कोळेकर, रंगराव शिंदे, मिलींद कोरे, रमेश साबळे, अनिल लोंढे, दिलीप ठोंबरे, संजय पाटील (बाबू), विजय घागरे, अजित माने, सलीम मुल्ला, योगेश कोळेकर, रणजीत घाडगे, अरविंद तांबवेकर, सुखदेव पाटील, जाफर मुजावर, प्रताप पाटील, अरविंद स्वामी, तम्माना घागरे,  कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक थोटे, मुख्यअभियंता मुंडे, अधिक्षक अभियंता गुणाले, हे उपस्थित होते. शेवटी युवा नेते विकास हाक्के यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते टेंभू योजनेच्या राष्ट्रीय महामार्ग काँसिंग ढालगांव वितरीका, म्हैसाळ योजनेच्या आगळगांव उपसा सिंचन योजना यासह अनेक कामांचे भूमीपूजन झाले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यास हजारो शेतकऱयांनी उपस्थिती दर्शविली होती. सभामंडप खचाखच भरुन गेला होता. खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत हाक्के यांनी हा मेळावा यशस्वी करुन दाखविण्याची किमया केली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी मेळाव्यात दुष्काळी भागातील पाणी योजना जलयुक्त शिवाय अभियान मराठा, धनगर आरक्षण, सुक्ष्म सिंचन योजना, शिवाजी महाराजांचे स्मारक या विषयांना स्पर्श करीत तत्कालीन आघाडी शासनाच्या भ्रष्टाचारावरही बोट ठेवले. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यानेतृत्वार विश्वास ठेवून कवठेमहांकाळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.