|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार

विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार 

प्रतिनिधी/ खेड, चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे तरुण जागीच ठार झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होवून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

टेम्पो चालक श्रीकृष्ण वसंत डेरे (वय 43) व त्याचा सहकारी अभिषेक दत्तकुमार कुडाळकर (वय 43, दोघे रा. पेठमाप, चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघाताने साखर झोपेतील साऱयांचीच तारांबळ उडाली. अपघाताची खबर मिळताच पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करताना यंत्रणेची दमछाकच झाली.

चिपळूणहून ठाण्याकडे घरसामान घेऊन जाणारा टाटा टेम्पो (एमएच08/डब्ल्यु -1486) या वाहानाला मागील बाजूने येणाऱया पिकअप जीप (एमएच 47-इ-1875) ने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे टेम्पोचा पुढील भाग विरुध्द दिशेला गेला त्याच वेळेला गोव्याकडे जाणारी लक्झरी बसने (एमएच 04-जीपी-2991) पिकअप जीपला जोराने धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक श्रीकृष्ण डेरे व त्याचा सहकारी अभिषेक कुडाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर आरामबस चालक संजय देवानंद जोशी यांनी महाड शहर पोलीस स्थानकात दिली.

या अपघातप्रकरणी पिकअप चालक रामगणेश शिवलाल यादव यास महाड पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्यावर भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ऐन सुट्टीचा दिवस अन् थर्टी फर्स्टच्या दिवशी घडलेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत होताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक दीपक मोरे यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय पवार, पोलीस हवालदार अष्टमकर, के.एम.भोईर, शिर्के, मातेरे, म्हात्रे, नाईक, पाटील पुढील तपास करत आहेत.

पेठमापवर शोककळा

या अपघात ठार झालेले श्रीकृष्ण डेरे व अभिषेक कुडाळकर हे दोघे पेठमाप येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

अभिषेक कुडाळकर हे येथील एचडीएफसी बँकेत नोकरी करत होते. त्यांचा छोटा भाऊ डोंबिवली येथे रहात असून त्याचा काही दिवसांपूर्वी विवाह झाल्यामुळे पेठमापहून काही घरगुती साहित्य किसन डेरे यांच्या गाडीतून नेण्यात येत होते. महाड येथे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अभिषेक यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे. चालक किसन डेरे हे उत्कृष्ट नाटय़ कलाकार होते. त्यांनी अनेक संगीत नाटकांमधूनही काम केले आहे. याशिवाय तबला, हार्मोनियम वादन व संगीत भजनाचीही त्यांना आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

या दोघांवर शनिवारी सायंकाळी पेठमाप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारीवर्ग मोठय़ासंख्येने सहभागी झाला होता.