|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जप्त रक्तचंदनामागे इसा हळदेच सूत्रधार!

जप्त रक्तचंदनामागे इसा हळदेच सूत्रधार! 

गायब हळदेला दोन दिवसांत हजर राहण्याची वनविभागाची नोटीस

प्रतिनिधी / चिपळूण

चिपळुणात जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या साठय़ानंतर या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे पुढे येत असून इसा हळदे हा यामागील सूत्रधार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इसा सध्या गायब असून त्याला दोन दिवसांत हजर राहण्याची नोटीस वनविभागाकडून बजावण्यात आली आहे. तपासासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून साठवणूक केलेला गाळा शनिवारी सील करण्यात आला आहे.

औषधी गुणधर्मामुळे देशाबरोबरच परदेशातही मोठी मागणी असलेल्या दुर्मिळ रक्तचंदनाचा अडीच टन साठा चिपळुणात सापडल्याने वनविभागही हडबडून गेला आहे. गुप्त माहितीवरून वनविभागाच्या फिरत्या पथकाचे शहाजी पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक, यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कमधील अलमका इमारतीतील समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीच्या गाळय़ात धाड टाकली. यात रक्तचंदनाचे 92 नग आढळून आले. सुमारे अडीच टन वजन असलेल्या या रक्तचंदनाची बाजारभावाप्रमाणे किंमत 40 लाखाच्या दरम्यान होते.

साठवणूक केलेला गाळा सील

शनिवारी कोल्हापूर येथील दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी वसंत भोसले यांनी येथे भेट देऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणात गाळा मालक दाभोळकर यांचा जबाब घेण्यात आलेला असून त्यामध्ये त्यांनी आपण हा गाळा काही दिवसांपूर्वी इसा हळदे यांना भाडय़ाने दिलेला असल्याचे सांगितले आहे. या गाळय़ात त्यांनी या रक्तचंदनाची साठवणूक केव्हा केली याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील चौकशी पूर्ण होईपर्यत सदर गाळा वनविभागाने शनिवारी सकाळी सील केला आहे.

सूत्रधार हळदेला नोटीस

दरम्यान, मोठय़ाप्रमाणात सापडलेल्या या रक्तचंदनाचा खरा सूत्रधार हा राजकीय क्षेत्रात वावरणारा इसा हळदे हाच असल्याचे पुढे आल्यानंतर तपासाची सूत्रे त्याकडे वळली आहेत. चौकशी अधिकाऱयांनी शनिवारी सकाळी हळदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता तो घरी आढळून आलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात हजर रहावे, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल अशी नोटीस वनविभागाने बजावली आहे.