|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला सरसकट घरफाळा वाढीस विरोध

गडहिंग्लजला सरसकट घरफाळा वाढीस विरोध 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गडहिंग्लज नगरपरिषदेने शहरातील मिळकत धारकांना घरफाळा वाढीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. सरसकट वाढ झाल्याचे दिसत असून मिळकतीत कोणताही बदल झालेला नाही असा मिळकत धारकांना 10 टक्के वाढ करावी असे सुचवत मिळतकतीत बदल झालेल्यांना नियमाप्रमाणे वाढ करावी असा ठराव नगरपरिषदेच्या आजच्या निकडीच्या विशेष सभेत सर्वानुमते करण्यात आला. नगराध्यक्षा स्वाती कोरी अध्यक्षस्थानी होत्या.

नगरपरिषदेच्या शाहू सभागृहात शनिवारी दुपारी ही सभा पार पडली. चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबतच्या एकमेव विषयावर आजच्या सभेत चर्चा झाली. सभेच्या सुरवातीस दिपक कुराडे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. घरफाळा कसा वाढला याची माहिती नागरिकांना द्यावयास हवी होती. ती दिली नसल्याने संताप असल्याचे राजेश बोरगावे यांनी सांगितले. हारुण सय्यद यांनी सरसकट वाढ झाल्याने मिळकत धारकावर अन्याय होत असून अशीच दर चार वर्षांनी वाढ झाल्यास एक दिवस घरफाळय़ा एवढी घराची किंमत होईल असे सांगत सरसकट 4 ते 5 टक्के वाढ करावी असे मत मांडले. बसवराज खणगावे यांनी झालेली वाढ कशी झाली याची माहिती प्रशासनाने मिळकत धारकांनी देण्याची गरज होती पण तसे झाले नसल्याने तक्रारी झाल्या आहेत. सौ. रेश्मा कांबळे यांनीही घरफाळा वाढीवर नाराजी व्यक्त करत वाढीच्या नोटीसा देताना माहितीची नोटीस नागरिकांना देण्याची गरज असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा सौ. कोरी यांनीही या वाढीवर नाराजी असून याची पूर्ण माहिती नागरिकांना देण्याची गरज असल्याचे सांगत मिळकतीत बदल झाला नसल्यास त्यांना 10 टक्के वाढ करावी आणि मिळकतीत बदल केला असल्यास नियमाप्रमाणे आकारणी करावी असे मत मांडले.

मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी दर चार वर्षांनी कर आकारणीत बदल होत असतो. सध्याच्या वाढीव नोटिसीवर तक्रार केलेल्या मिळतक धारकांची पहाणी करून काही बदल केले आहेत. यातही तक्रार असल्यास मालमत्ता कर अपील समितीकडे तक्रार करता येते. असे सांगत चार वर्षेत निरंतर चालणारी ही प्रक्रीया असून भाडेकरू सोडल्यास पुढील वर्षी घरफाळा कमी केला जातो. यापूर्वी तसे बदल केल्याचे सांगितले. कर निरीक्षक साने यांनीही याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी मिळकतीत बदल केला नसेल तर 10 टक्के वाढ करावी आणि मिळकतीत बदल केला असल्यास नियमाप्रमाणे घरफाळा आकारणी करावी असा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नरेंद्र भद्रापुर, श्रध्दा शिंत्रे, रुपाली परीट वगळता सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. प्रशासनाची बाजू मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सांभाळली.