|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नववर्षाचे जल्लोषात स्वागत 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शनिवारी रात्री 12 वाजता घडय़ाळाचा ठोका पडला आणि 2016 हे वर्ष मागे सरुन 2017 या नवीन वर्षाला सुरुवात झाली. साहजिकच ज्या आतुरतेने सर्वजण या नवीन वर्षाची वाट पहात होते त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना आलिंगन देत, शुभेच्छांचा वर्षाव करत 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या निमित्ताने अनेकांनी नवीन संकल्प करत विविध  सामाजिक उपक्रम राबवले. अनेकांनी रात्र जागवली.

डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते सरत्या वर्षाला निरोप देण्याचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे. यानिमित्त प्रत्येकाकडून आपल्या परीने या स्वागताचे नियोजन केल जाते. कोणी कुटुंबासोबत नियोजन करतात तर कोणी मित्र मैत्रिणीसोबत. बहुतांशजण गोवा आणि समुद्रकिनारी आणि पर्यटनस्थळी जाऊन  नववर्षाचे सेलिब्रेशन करतात. शहरातील हॉटेल्स तर यावेळी हाऊसफुल्ल होतात. कोल्हापूरवासिय शनिवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागले होते. दिवस मावळतीला जाईल तसे 2017 या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्कंठा लागली होती. अखेर रात्रीचे बारा वाजले आणि करवीरवासांनी 2016 या सरत्या वर्षाला निरोप देत 2017 चे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला.

नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची उद्याने खुली होती. यामुळे करवीरवासांनी या उद्यानात गर्दी केल्याने उद्याने रात्री उशिरापर्यंत फुलली होती. बरोबर बारा वाजता तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी प्रचंड जल्लोष केला. नवीन लाभदायी, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणाईमध्ये एकच उत्साह दिसून येत होता.

चौकट

शनिवारमुळे अनेकांनी 31 डिसेंबर साजरा केला घरातच

शनिवारी बहुतांश लोकांचा उपवास असतो. यामुळे उपवास करणाऱयांनी शुक्रवारीच सेलिब्रेशन केले. तर अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत शाकाहार ग्रहण करत घरातच नवीन वर्षाचे स्वागत केले. पण या नव वर्षाच्या निमित्ताने उत्साहाला उधाण आले  होते. 

Related posts: