|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » समाजसेवेचे बाळकडू घरातच मिळाले

समाजसेवेचे बाळकडू घरातच मिळाले 

वासुदेव चोडणकर/ पर्वरी

लहानपणी घरातून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू जीवनात भरीव कार्य करण्यास प्रोत्साहन देत असते. समाजातील गरज आणि दुर्बलांसाठी कार्य करण्याची मनात इच्छा ठेऊन केलेल्या सेवेची जनमानसात प्रशंसा होत असते. स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवणारे मोजकेच लोक असतात. त्यामध्ये पर्वरीचे संजय स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर यांचा समावेश आहे.

गुरुप्रसाद पावसकर यांचा जन्म आणि शिक्षण म्हापसा येथे झाले. आई-वडिलांना समाजसेवेची आवड होती. त्याचा प्रभाव गुरुप्रसादच्या मनावर पडला. कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘रोट्रेक्ट’ या युवा सामाजिक संस्थेत प्रवेश केला. तेथे त्यांना अनेक मित्र मिळाले. प्रा. अनील सामंतसारख्या समविचारी व्यक्तीबरोबर त्यांचे संबंध वाढले. रोट्रेक्ट संस्थेत कार्य करताना अपंग व्यक्ती, वृद्ध विशेष मुलांशी त्यांचा संपर्क आला. संस्थेतर्फे अपंगांना चाकाच्या खुर्चीची सोय करणे, गरजूंना मदत करणे हे कार्य सुरु झाले.

1999-2000 मध्ये ते म्हापसा रोटरी क्लबचे अध्यक्ष बनले. त्यावेळी समाजातील दुर्बल घटक, विशेष मुले यांच्या सोयीसाठी बार्देश तालुक्यात एकही शाळा नव्हती. या उणिवेची मित्रमंडळीबरोबर चर्चा होत असे.

समविचारी मित्र यांच्या सहयोगाने रोटरी क्लबमार्फत म्हापसा येथे विशेष मुलांसाठी ‘आनंद निकेतन’ या संस्थेची स्थापना केली. एका भाडय़ाच्या खोलीत या संस्थेच्या कार्याची सुरुवात झाली. फक्त दोन विशेष मुलांना घेऊन सुरु केलेल्या या संस्थेत 70 मुले विविध प्रकारचे शिक्षण घेतात तसेच डेकेअर सेंटरही चालू आहेत.

रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना गुरुप्रसाद यांनी म्हापसा येथे रोटरी ट्रेड फेअर आयोजित करून त्यातून 11 लाख रुपये जमविले. या रकमेचा विनियोग आनंद निकेतनची स्वतंत्र इमारत, शिक्षकांचा पगार व आवश्यक सुविधांची सोय केली. तत्पूर्वी पावसकर यांनी मेधा पर्रीकर रुग्णसेवेत खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळून समाजसेवेचा अनुभव घेतला.

भारत विकास परिषद पर्वरी या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष होते. शारदा व्याख्यान मालेच्या निमित्ताने त्यांचा परिचय थोर समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शंकर अभ्यंकर, शरद पोंक्षे व इतरांबरोबर झाला. त्यामुळे त्यांना स्फूर्ती मिळाली.

2012 साली आनंद निकेतन संस्थेच्या वर्धापनदिनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर  पर्रीकर प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी पर्रीकर यांनी पावसकर यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. त्याचवर्षी संजय स्कूल पर्वरी संस्थेच्या नवीन कार्यकारिणीत गुरूप्रसाद पावसकर याची उपाध्यक्षपदी निवड केली.

आनंद निकेतनमधील विशेष मुलांसाठी कार्य करीत असताना त्यांचा अनुभव संजय स्कूलमध्ये कार्य करताना कामी आला. संजय स्कूलमधील उपलब्ध सुविधांचा त्यांनी अभ्यास केला. विशेष मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास लागणाऱया आवश्यक सुविधांचा त्यांनी पाठपुरावा केला. विशेष मुलांसाठी आवश्यक फिजिओथेरोपी सेंटरला प्राधान्य देऊन शिक्षकांची निवड केली.

विशेष मुलांना शिकविणाऱया शिक्षकांना डी. एड. कॉलेज सुरु केले.

संजय स्कूलमध्ये कोणतीही नवीन सुविधा किंवा यंत्रणा आणण्यापूर्वी पावसकर स्वत: मुंबई-पुणे येथे त्या-त्या संस्थेला भेटी देऊन अभ्यास व निरीक्षण करून संपूर्ण माहिती प्राप्त करतात. हे पावसकर यांचे वैशिष्टय़ आहे.

बेंगलोर येथील एनाबेल इंडिया या संस्थेला भेट दिल्यानंतर त्यांनी तेथील मुले पेट्रोल पंप किंवा तत्सम कामे करून स्वत:च्या पायावर उभी आहेत. तेथील पाहणीनंतर पावसकर यांनी संजयस्कूलमधील काही विशेष मुलांनाही गौरी पेट्रोल पंपावर कामावर ठेवण्यासाठी मालकांसाठी चर्चा केली. त्यांनीही लगेच सकारात्मक होकार दाखवून काही मुलांना पेट्रोलपंपावर कामावर ठेवण्यापूर्वी प्रशिक्षण दिले. पर्वरी, पेडणे, वास्को येथील पेट्रोल पंपावर ही मुले काम करीत असल्याचे दिसून येते.

विशेष मुलांसाठी कार्य करणे हे मनाला खूप समाधान मिळते. आपला वेळ चांगल्या कार्यासाठी खर्ची होतो. हा आनंदच वेगळा आहे, असे गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.

राज्यात विशेष मुलांसाठी 26 शाळा, 39 शैक्षणिक गरजा केंद्रात मिळून सुमारे 3300 मुले आहेत.

गुरुप्रसाद यांच्या मातोश्री स्वामिनी पावसकर या अखिल भारतीय महिला परिषद पर्वरीच्या 25 वर्षे अध्यक्षा होत्या तर वडिल रमेशचंद्र उद्योजक संस्थेचे अध्यक्ष व रोटरी म्हापसाचे अध्यक्ष् होते. त्याशिवाय पावसकर यांचा अनेक सामाजिक संस्थासाठी कार्य केले आहे. झेस्ट यूथ क्लब, जागृती महिला कल्याण संघटना यांची स्थापना त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

गुरुप्रसाद पावसकर यांनी संजय स्कूलच्या जडणघडणसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. विशेष मुलांसाठी काम करीत मला समाधान लाभते. गोवा पायाभूत विकास मंडळातर्फे संजयस्कूलच्या इमारतीचा कायापालट होऊन अनेक आधुनिक यंत्रणा व सुविधांमुळे ही संस्था एका कर्तबगार व्यक्तीच्या हाती आहे अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करतात.

 

Related posts: