|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केपेच्या नगराध्यक्षपदाचा फिलू डिकॉस्तांकडून राजीनामा

केपेच्या नगराध्यक्षपदाचा फिलू डिकॉस्तांकडून राजीनामा 

वार्ताहर/ केपे

केपेचे नगराध्यक्ष फिलू डिकॉस्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालकांना शुक्रवारी सादर केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डिकॉस्ता यांनी आपला राजीनामा दिल्याने हा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. ते स्थानिक आमदार चंद्रकांत कवळेकर यांचे खास समर्थक मानले जातात. यासंदर्भात डिकॉस्ता यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा समझोत्यास अनुसरून दिला असल्याचे स्पष्ट केले.

पालिका निवडणुकीत केपे पालिकेवर काँग्रेसप्रणित गटाने वर्चस्व गाजविले होते आणि आमदार कवळेकर यांच्या गटातील 11 पैकी 9 नगरसेवक निवडून आले होते. तसेच डिकॉस्ता हे दुसऱयांदा पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. ते माजी नगराध्यक्षा लिडिया डिकॉस्ता यांचे पती असून पालिका निवडणुकीनंतर त्यांच्या गळय़ात नगराध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली होती.

डिकॉस्ता यांच्या राजीनाम्याविषयी आमदार कवळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पालिकेतील काँग्रेसप्रणित नऊही नगरसेवक एकसंध असून सर्वांना संधी मिळावी याकरिता नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ समझोत्यानुसार वाटून देण्यात आला आहे. कसलेच मतभेद न ठेवता बिनविरोध नगराध्यक्ष निवडला जाईल.