|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र

गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र 

उदय सावंत/ वाळपई

गोमंतकात गोवंश धोक्यात येणाऱया अनेक गोष्टी घडत आहेत. गोवंश अबाधित न राहिल्यास येणाऱया काळात समाजात त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. वाळपई नाणूस येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेले गोरक्षा-गोसंवर्धन या मंत्राचा जप करणारे अखिल विश्व श्रीराम गोसंवर्धन केंद्र म्हणजे वाळपईचे व उभ्या गोमंतकाचे भूषण आहे कारण याच केंद्राच्या वैचारिक क्रांतीने समाजात गोवंश रक्षणाचा विचार रुजला जात आहे. एका वेगळय़ाच संकल्पनेद्वारे अवघड स्तरावर ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या केंद्राची स्थापना व उभारणी म्हणजे एक योगायोगच होता.

जवळपास आठ वर्षांपूर्वी या भागात राहणाऱया एका साकी शेळके नामक महिलेची गाय बेपत्ता झाली होती. तिची शोधाशोध करण्यात आल्यानंतर सदर गायीची चोरी करून हत्या करण्याचा डाव आहे, अशा स्वरुपाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, रामचंद्र जोशी आदी मंडळींनी पुढाकार घेऊन सदर गायीची सुटका करण्यात आली होती. याचवेळी गोवंश धोक्यात आहे, त्यासाठी आपण प्रामाणिक स्तरावर कार्य करण्याची गरज आहे, असा विचार पुढे आल्याने 25 मे 2008 साली गोसंवर्धन केंद्राची स्थापना झाली. गेल्या आठ वर्षांपासून केंद्राचे व्यवस्थापन फक्त गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच मुद्दय़ावर व विचारधारेवर काम करीत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अंमलात यावा यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्यात येत आहे. सरकार दरबारी प्रयत्न करूनही याची पूर्तता झालेली नाही मात्र व्यवस्थापनाच्या माध्यमातून गोप्रेमींनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. सरकारदरबारी याच स्वरुपात विविध प्रकारे प्रयत्न करीत असताना राज्यात बेकायदा कत्तल पूर्णपणे बंद व्हावी, यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्य सुरू आहे. यासाठी डिचोली येथे बैलांची बेकायदा कत्तल रोखण्यात आल्यानंतर यासंबंधीच्या कार्याला अधिक गती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे उसगाव मांस प्रकल्प भागात यासंबंधी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

शासनाची कोणतीही मदत नसताना सामाजिक तत्त्वांवर ही प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यावर अपघातात सापडणाऱया गायींचे पालन या केंद्रातर्फे करण्यात येत आहे. आज जवळपास 350 च्या आसपास गायींचे व्यवस्थापन या केंद्राद्वारे करण्यात येत आहे. यामुळे अनेकवेळा खर्चाचा ताळमेळ साधताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र अनेक गोप्रेमींकडून होणारी आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा कारभार यशस्वीपणे सुरू आहे.

या केंद्राच्या उभारणीसाठी रामचंद्र जोशी कुटुंबियांकडून जवळपास पाच एकर जमीन दान करून यासंबंधी विशेष असे योगदान दिले गेले आहे. वाळपई शहरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रात गोप्रेमींच्या सहकार्याने सहा गोठा घरांची उभारणी करण्यात आली आहे. या गोठाघरात सेवाभावी वृत्तीने गो-सेवक काम करीत आहेत. गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच एका भावनेने ते काम करीत आहेत. या केंद्रात नित्यनियमाने धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक विकासाला महत्त्वपूर्ण स्तरावर चालना देण्याचे महत्त्वाचे योगदान देण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून कुडाळ येथील चिकित्सक वैद्य सुविनय दामले यांचा मासिक अमावस्या दिनी येथे व्याख्यानाचा कार्यक्रमही होत असतो. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करण्याचे कार्यही होताना दिसत आहे. गोसंवर्धन केंद्रात होणाऱया दुग्धोत्पादनातून विविध स्वरुपाचे पदार्थ बनविताना गोमूत्र अर्क देखील तयार करण्यात येत आहे.

सध्या केंद्रात सप्त गोमाता मंदिराची उभारणी व्हावी यासाठी संकल्प करण्यात आला आहे. गोमंतकात उभे राहणारे अशा प्रकारचे हे पहिलेच मंदिर ठरणार आहे. त्याचबरोबर मासिक सत्संग आयोजित करण्यात येत आहे. यातून बौद्धिक स्वरुपाचा कार्यक्रमही होत असतो.

गोसंवर्धन केंद्राचे कार्य यशस्वीपणे पार पाडावे यासाठी हनुमंत परब यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. यात सचिव विवेक जोशी, खजिनदार लक्ष्मण जोशी, व्यवस्थापक रामचंद्र जोशी, सभासद महेश मणेरीकर, गुरुदास वझे, अमरजी बोराना, सुहास जोशी यांचा समावेश आहे.