|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मगो-मंच युतीची घोषणा पुढील आठवडय़ात

मगो-मंच युतीची घोषणा पुढील आठवडय़ात 

प्रतिनिधी/ पणजी

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी सज्ज झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि मगो पक्ष यांच्यातील युतीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. निवडणुकीची घोषणा होताच जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात युतीची घोषणा करण्यात येणार आहे. प्राथमिक बोलणीत मतदारसंघ वाटप आणि उमेदवार याबाबतही एकमत झाले आहे. केवळ एक दोन मतदारसंघात उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

मगो पक्ष भाजपपासून पूर्णपणे दुरावला हे आता स्पष्टच झाले आहे. भाजपने अजूनही तडजोडीची भाषा चालविली असली तरी मगो नेते सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाषा सुरक्षा मंचला मगोच्या भाजपविरोधी भूमिकेबाबत पूर्ण खात्री पटली आहे. भाजपने मातृभाषेबाबत केलेली दगाबाजी भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपला धडा शिकविण्यासाठी मगोशी युती करावीच लागेल हे मंचच्या नेत्यांनी जाणले आहे. आता मगो नेत्यांनी भाजपपासून पूर्णपणे फारकत घेतल्याने मंच आणि मगो युतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

डिचोलीबाबत तडजोड शक्य

मंचने कोणत्या मतदारसंघात लढावे आणि मगोने कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवावी यावर प्राथमिक चर्चा झाली आहे, पण अंतिम निर्णय झालेला नाही, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. चर्चेच्या पुढील फेरीत मतदारसंघाबाबत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. डिचोली मतदारसंघाबाबत थोडी अडचण निर्माण होणार आहे, कारण डिचोली मतदारसंघासाठी माजी आमदार पांडुरंग राऊत यांच्या नावाची मंचने घोषणा केली आहे, तर मगोने डिचोली मतदारसंघ मागितला आहे. विद्यमान आमदार नरेश सावळ हे मगोचे भावी उमेदवार आहेत. सावळ हे प्रबळ दावेदार असल्याने या मतदारसंघासाठी थोडी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मंचच्या नेत्यांना याची जाणीव आहे. त्यामुळे डिचोलीबाबत मंचही तडजोड करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळाली आहे.

पाच मतदारसंघात मंचचे उमेदवार

मगो पक्ष 28 जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे. मंचने पाच मतदारसंघात उमेदवार उभे करावे असेही प्राथमिक चर्चेत ठरले आहे. मये, सांखळी, शिवोली या तीन मतदारसंघासह अन्य दोन मतदारसंघात मंचने उमेदवार उभे करावे अशी तयारी चालली आहे. हे तिन्ही मतदारसंघ भाजपकडून काढून घेण्याची रणनिती मंचने आखली आहे. मंचची लढाई गोव्याच्या हिताच्या निश्चित ध्येयासाठी आणि उद्दिष्टपूर्तीसाठी असल्याचे मंचच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.