|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरत्याला निरोप : नववर्षाचे स्वागत जल्लोषात

सरत्याला निरोप : नववर्षाचे स्वागत जल्लोषात 

वार्ताहर / निपाणी

सरत्या 2016 वर्षातील चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देत झाले गेले विसरून जाऊ, वाईटाची होळी होऊ दे. तर चांगल्या गोष्टी सदैव सोबत राहू देत असे म्हणत सरत्या वर्षाला निरोप व नववर्षात वेगवेगळे संकल्प करून 2017 वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. 31 रोजी मध्यरात्री 12 च्या ठोक्यावर हा निरोप व स्वागताचा जल्लोष साजरा केला गेला. यावेळी झालेल्या आतषबाजीमुळे संपूर्ण निपाणीसह ग्रामीण भाग काळोख्या रात्रीही उजळून गेला होता.

भारतीय संस्कृतीप्रमाणे नववर्षाचे स्वागत चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला करण्यात येते. ही आपली भारतीय परंपरा आहे. असे असले तरी संपूर्ण जगभरात इंग्रजी दिनदर्शिकेनुसार सुरू होणारे नवीन वर्ष 31 डिसेंबरच्या मध्यरात्री साजरा करण्याची अलिकडच्या काळात परंपरा रुजत आहे. पाश्चात संस्कृतीचे अनुकरण करत अनेकजण ही वेळ साधत आनंदाला उभारी देण्यासाठी वेगवेगळी नियोजन केले होते. काहीजण हॉटेल, धाबे अशा ठिकाणी तर संस्कृती जोपासणारे आपल्या घरीच राहून घरच्यांसोबत सरत्यावर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करतात. हा जल्लोष सर्वत्रच पहायला मिळाला.

नव्या वर्षाचा संकल्प

नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्यावसायिक मंदी निर्माण झाली असली तरी या मंदीतही अनेकांनी आपल्या परीने जल्लोष साजरा करण्यात पुढाकार घेतला होता. मध्यरात्री 12 वाजता हा जल्लोष करताना अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. सरत्यावर्षाला निरोप देत नववर्षात नवे संकल्प उराशी बाळगून स्वागत करण्यात आले. यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसत होते.