|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कंटेनर-ट्रक अपघातात एक ठार

कंटेनर-ट्रक अपघातात एक ठार 

वार्ताहर/ मांजरी

मांजरी-मांजरीवाडी दरम्यान कंटेनरने थांबलेल्या ट्रक्टरला जोराची धडक दिल्याची घटना 31 रोजी पहाटे 5 च्या सुमारास घडली. त्यात कंटेनर चालक आपल्याच वाहनाखाली सापडून जागीच ठार झाला. अपघातग्रस्त कंटेनर हरियाणा येथील असून ठार झालेल्याचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शनिवारी पहाटे चिकोडी-मिरज राज्यमार्गावरून मांजरी व मांजरीवाडी दरम्यान कंटेनर (एचआर 47 सी 1180) मिरजच्या दिशेने चालला होता. तर ट्रक्टर (एमएच 13 बीआर 0039) वड्डी येथून ऊस घेऊन ओम शुगर्सकडे जाण्यासाठी थांबला होता. कंटेनर चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरने ट्रक्टरला जोरदार धडक दिली. चालकाकडील बाजू पूर्णपणे तुटल्याने चालक त्याच कंटेनरच्या चाकाखाली सापडून ठार झाला.

यामध्ये ट्रक्टरच्या एका बाजूचा मोठा टायर फुटला तर मागील डब्यातील ऊस खाली पडला होता. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक येडूरवाडीमार्गे वळवण्यात आली. सदर घटनेची माहिती अंकली पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पण रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती. मृतदेह विच्छेदनासाठी चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आला होता.

राज्यमार्ग बनला धोकादायक

 सध्या चिकोडी-मिरज राज्यमार्गावरुन ऊस वाहतूक मोठय़ाप्रमाणात होत आहे. त्यामुळे हजारो वाहनांची वर्दळ दिवस-रात्र सुरु आहे. वाहनांची संख्या अधिक मात्र रस्त्याची रुंदी कमी अशा परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर नेहमी होत आहेत. शिवाय बाजूपट्टय़ाही धोकादायक बनल्याने दुचाकीस्वार, सायकलस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. पावसाळ्य़ात रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणीचे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या खडबडीतपणामुळे व बाजूपट्टय़ा खचल्याने या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

नियमांचे पालन आवश्यक

वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे  अपघातांची संख्येत वाढ होत आहे. होणार धोका टाळण्यासाठी वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. परिसरातील रस्ते रुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱया वाहनांना थांबलेल्या वाहनांचा अडथळा होत आहे. अशावेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.

Related posts: