|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सोलारनिर्मित विजेची ‘हेस्कॉमला’ देणगी

सोलारनिर्मित विजेची ‘हेस्कॉमला’ देणगी 

अस्मिता कंग्राळकर

सरकारतर्फे देशाच्या अभिवृध्दीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण काही योजनांचा तितकासा पाठपुरावा केला जात नाही किंवा त्याबाबत नागरिकांमध्ये तितकीशी जागृती होत नाही. यामुळे अशा प्रकारच्या योजना काही वेळेला मागे पडतात. पण अशा एका ‘सोलार योजना’ प्रोजेक्टचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न शास्त्रीनगर येथील कब्बुर कुटुंबियांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रतिक कब्बुर या सी ए चे शिक्षण घेत असणाऱया विद्यार्थ्यांने सोलारनिर्मितीविषयीची माहिती एका वृत्तपत्रात वाचली. यावरून त्यांना ही कल्पना सुचली. त्यानुसार त्याने त्याची आई स्वप्ना कब्बुर यांच्याशी चर्चा करून सविता हेब्बर यांच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेतली.

पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचविता ही योजना राबविण्यात येते. सध्याची स्थिती पाहता पुढील काळात अधिकाधिक वीज निर्मितीसाठी सोलारचाच वापर करताना पाहावयास मिळेल. तसेच या सोलार पॅनलमुळे इतर वेळी आपल्याला वीज टंचाईचा सामना करावा लागतो. काही वेळेला तर संपूर्ण दिवस किंवा रात्र आपल्याला विजेविना घालवावी लागते. पण सोलार पॅनलमुळे आपल्याला दिवसा वीजटंचाईचा सामना करावा लागणार नाही. तसेच सोलार पॅनल ऑनलाईनशी जोडले गेले असून, किती युनिट वीज तयार झाली, याबद्दलची सर्व माहिती ऑनलाईनद्वारे मोबाईलवर एका सेकंदात मिळते.

जिह्यातील सर्वात मोठे सोलार प्रोजेक्ट

टेरेसवर करण्यात आलेले हे जिह्यातील पहिले सर्वात मोठे प्रोजेक्ट आहे. यासाठी त्यांना एकुण 15 लाख रूपये इतका खर्च आला. दिवसाला सध्या 90 ते 110 युनिट वीज निर्माण होत असून प्रती महिना 2400 युनिट वीज तयार होते. त्यापैकी 120 युनिट वीज घरी वापरण्यात येते व उर्वरीत वीज हेस्कॉमला दिली जाते. सदर वीज हेस्कॉमतर्फे प्रति युनिट 9 रूपये 56 पैसे या दराने खरेदी केली जाते. यानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खात्यावर पैसे जमा होतात. यानुसार हेस्कॉमतर्फे 25 वर्षाचा करारदेखील करण्यात आला आहे.

टेरेसवर उभारला सोलार पॅनल

शास्त्रीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या टेरेसवर हा सोलार पॅनलचा प्रोजेक्ट उभा केला. टेरेसपासून जवळपास 15 फूट ऊंचीवर हा प्रोजेक्ट उभारला असून, या सोलार पॅनलच्या उभारणीमुळे येथे कोणतेही समारंभ करताना कोणत्याही मंडपाची उभारणी करावी लागत नाही. तसेच पावसाळ्यात पाऊस देखील येथे लागत नाही. त्यामुळे वेगळा असा मंडप किंवा पत्र्याचे शेड घालण्याचा खर्चदेखील वाचला आहे.

पावसाळ्यातदेखील वीज निर्मिती

सदर सोलार पॅनलचा प्रोजेक्ट पूर्णत: सूर्यकिरणांवर आधारीत आहे. त्यामुळे पावसाळ्य़ात देखील वीज निर्मिती होते. पण यावेळी प्रति दिवसा 60 ते 70 युनिट इतक्या प्रमाणातील ही वीज तयार होते. त्यामुळे पावसाळ्यात देखील यामधून वीजनिर्मिती केली जाते.

 

 

कर्ज पुरवठा (सोलार लोन)

या योजनेसाठी लागणारा खर्च प्रत्येकाला न परवडणारा किंवा पैशाअभावी कित्येकजण या योजनेचा अवलंब करत नव्हते. त्यामुळे यासाठी सरकारने सबसिडी (लोन) जाहीर केली आहे. पण ज्यावेळी या सबसिडीचा वापर करून हा सोलार पॅनल प्रोजेक्ट उभारला जातो त्यावेळी ही वीज प्रति युनिट मागे 7 ते 8 रूपये यादराने खरेदी केली जाते.

हेस्कॉमने जागृती करणे गरजेचे

सध्या देशातील गुजरातमध्ये सोलारद्वारे निर्माण करण्यात येणाऱया विजेचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्यानुसार या योजनांसदर्भातील जागृती ही हेस्कॉमने करणे गरजेचे आहे. कारण याचा फायदा हा हेस्कॉमला देखील तितकाच होतो. हेस्कॉम कित्येक वेळेला इतर राज्यांकडून वीज खरेदी करते. तसेच काही वेळेला तर वीज चोरी होण्याचे प्रकार देखील घडतात. यामुळे इतर राज्यातून वीज खरेदी करून आपल्या राज्यात वापरण्यापेक्षा अशा प्रकारच्या योजनांबद्दली जागृती नागरिकांमध्ये करावी.

Related posts: