|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ग्रामीण प्रश्नांचा वेध घेणारा झाला बोभाटा

ग्रामीण प्रश्नांचा वेध घेणारा झाला बोभाटा 

बऱयाच मोठय़ा ब्रेकनंतर मराठीत ग्रामीण कथा असलेला ‘झाला बोभाटा’ हा विनोदी सिनेमा येत आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती किंग क्रिएशन डिजी टेक्नो एण्टरप्राईजेस प्रॉडक्शनच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. पुढील वर्षी 6 जानेवारी 2017ला आपल्या जवळच्या चित्रपटगफहात झाला बोभाटा प्रदर्शित होणार आहे.
साईनाथ राजाध्यक्ष म्हणाले की, महेंद्रनाथ आणि मी सामाजिक आशय विषय असलेला एक विनोदी सिनेमा केला आहे. आम्ही स्वत:ला नशीबवान समजतो की, आमच्या सिनेमासाठी आम्हाला इतकी चांगली आणि मोठी स्टारकास्ट मिळाली आहे. निर्माते महेंद्रनाथ म्हणाले की, जेव्हा अनुपने मला हे कथानक ऐकवले. तेव्हाच या सिनेमावर काम करण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही नशीबवान आहोत की, आमच्या या सिनेमासाठी उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ आम्हाला मिळाले. मला सुद्धा या सिनेमात एक भूमिका करण्याची संधी मिळाली असून प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय वेगळा होता. तर दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, हा दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच सिनेमा आहे. तरीही दिग्गज कलाकारांकडून मला चांगली साथ मिळाली. मला विश्वास आहे की, प्रेक्षक आमच्या मेहनतीचे भरभरून कौतुक करतील आणि या सिनेमाला प्रतिसाद देतील. अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. ग्रामीण भागांतील भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळलेल्या गावकऱयांची व्यथा सिनेमात मांडण्यात आलीय. त्यातच दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते. पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात अशा घडामोंडीवर सिनेमाची कथा फिरते.
‘झाला बोभाटा’ या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, संजय खापरे, दिपाली अंबिकार, तेजा देवकर, मयुरेश पेम, मोनालिसा बागल, महेंद्रनाथ, बाळकृष्ण शिंदे, रोहित चव्हाण, रिना अग्रवाल, अश्विनी सरपुर, डॉ. साहिल, निलेश भोईर, रोहित साळवी यांच्यासारखे उत्तम कलाकार आहेत. तर या सिनेमाची कथा अनुप जगदाळे यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. या सिनेमात तीन गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे यांनी या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. मंगेश कांगणे यांचा गीतकार म्हणून हा 75 वा मराठी सिनेमा आहे. तर या सिनेमातील गाणी आदर्श शिंदे, प्रविण कुंवर, ए. व्ही. प्रफुलचंद्र आणि सरोज बोधनकर यांनी गायली आहेत.