|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माणुसकीच्या अंतरंगात

माणुसकीच्या अंतरंगात 

आजपासून आमचे जुने स्तंभ लेखक ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची ‘माणुसकीच्या गोष्टी’ ही पाक्षिक लेखमाला सुरू करत आहोत. सामान्य माणसातील उदात्त भावनांचा जयघोष करताना मानवी विकार विलसतांकडे सहृदयतेने पहात ललित अंगाने माणुसकीचा विविध अंगांनी प्रत्यय देणाऱया ललित लेखांची माला माणुसकीचा दीप उजळवायला मदत करेल.

‘माणसानं माणसांशी माणसासारखं (म्हणजेच माणुसकीनं) वागावं ही खरी मानवी संस्कृती!’ एकदम मान्य ना? यापेक्षा संस्कृतीची अधिक सुंदर व्याख्या दुसरी कोणती असू शकते? माणूस हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. तो एकाकी बेट नाही. त्याला माणसाच्या समूहातच जगायला आवडतं. अशावेळी त्यानं इतरांशी कसं वागावं? जसं आपल्याला इतरांनी आपल्याशी प्रेम, सामंजस्य व रस घेऊन सौहार्दानं बोलावं असं वाटतं तसंच आपणही.

मला खात्री आहे हे वाचताना अनेकांच्या मनात ‘एक राजा जसा दुसऱया राजाशी वागतो, तसं तू मला वागवावंस!’ हे वाक्मय घुमू लागले असणार. जगज्जेत्या सिकंदरापुढे पराक्रमाची शर्थ करूनही पराभूत झालेल्या राजा पोरसला पकडून उभे केले, तेव्हा त्याने विचारले होते, ‘मी कसं वागावं तुझ्याशी?’ तेव्हा पोरसने हे बाणेदार उत्तर दिल्याची इतिहासाच्या पाठय़पुस्तकातील कथा नक्कीच आठवली असणार. आता राजे, राजघराणे व साम्राज्ये नाहीत. जगात बहुसंख्य देशात लोकशाही आहे मानवी हक्काची व्याप्ती मोठी आहे, आणि तिचं अधोरेखित तत्त्व आहे-जगा व जगू द्या. प्रत्येक माणसानं इतरांच्या स्वातंत्र्य व हक्काचा संकोच न करता समाधानानं जगावं व इतरांनाही जगू द्यावं ही सुद्धा मानवी संस्कृतीची दुसरी व्याख्या मानता येते!

इतकं साधं, सरळ नैसर्गिक असं हे आहे तर, मग जगात एवढी विषमता, अन्याय, भेदाभेद व हिंसाचार, कलह, द्वेष का आहे? पुन्हा उत्तर साधं आहे- आपण ‘जगा व जगू द्या’ हे तत्त्व पाळत नाही. मानवी संकृती आचरत नाही. कारण? कारण मानवी मन हे षड्विकारांची शिकार आहे. पुन्हा त्याचा हव्यास वाढला आहे. इतरांना अंकित ठेवत जगण्याची विकृती वाढली आहे. जागतिकीकरण व ‘मार्केट इकॉनॉमी’-बाजारी अर्थशास्त्रामुळे पैसा हे एकमात्र जीवनमूल्य झालं आहे. जितका अधिक पैसा तेवढं सुख मोठं असा एक बहुसंख्य मान्य असा आचार झाला आहे. त्यामुळे माणूस हा अधिक आत्मकेंद्री व स्वार्थलोलूप झाला आहे.

      ‘सेल्फीशझम’ (स्वस्वार्थता)

‘सेल्फी’ हा आजच्या नेटसॉवी तरुणाईचा परवलीचा मंत्र झाला आहे. माझी त्याच्याबद्दलची व्याख्या आहे, ‘सेल्फी म्हणजे काय? तर मी, मी आणि मी. सर्वात आधी मी आणि सर्वात शेवटी मी. किंबहुना मी पलीकडे माझ्यासाठी जगच मुळी अस्तित्वात नाही.’ ‘सेल्फीझम’ म्हणजे ‘सेल्फीशझम’ (स्वस्वार्थता) होय. आणि ती ‘माणसानं माणसाशी माणसांप्रमाणे (म्हणजे माणुसकीनं) वागावं’ या संस्कृतीला छेद देते. ‘जगा व जगू द्या’ च्या उदात्त तत्त्वाला काट मारते. आणि एक निर्घृण स्वार्थी, पैसा केंद्रित स्वहित पाहणारी व मानवी हित व मूल्य नाकारणारी नवी भयावह समाजव्यवस्था म्हणजे ‘सेल्फी(श)झम’ होय!

इथे विनोबा भावेंचे एक अर्थवाही वचन आठवतं. त्याचा भावार्थ असा आहे, ‘आपल्या हातातील अर्ध्या भाकरीचा तुकडा इतर कुणाला न देता स्वतः खाणं म्हणजे प्रकृती. आपलं पोट अधिक भरावं म्हणून इतरांच्या हातची भाकरी हिसकावून घेत त्याला उपाशी ठेवणं म्हणजे विकृती. पण स्वतःची भूक आवरत आपल्या अर्ध्या भाकरीतला निम्मा तुकडा दुसऱया भुकेल्याला देत त्याची भूक भागवणं म्हणजे संस्कृती होय!’

मागील दोन सहस्रकामधील मानवाचा इतिहास पाहिला तर तो हिंसा, वर्चस्व, स्वार्थ व लोभाचा प्रामुख्याने आहे हे मान्य करावं लागेल. एखादाच म. गांधी जन्मतो, पण प्रत्येक काळात प्रत्येक देशात क्रूरकर्मा व माणुसकीला कलंक असणारे हिटलर, इडी अमिन, ओसाबा बिन लादेन वा बगदादी, जनरल डायर किंवा नथुराम गोडसे पैदा होताना दिसतात. त्यांच्यामुळे मानवता रक्तबंबाळ होते व ‘जगा व जगू द्या’चे तत्त्वज्ञान प्रश्नांकित होते!

पण हेही तेवढंच खरं की अशी क्रूर माणसे कमीच असतात, पण त्यांचं बळ प्रचंड असतं व एकूण माणूस वर्गास ते वेठीस धरत त्याच्यावर अत्याचार करत असल्यामुळे ही तर सहज मानवी प्रवृत्ती तर नाही असा संभ्रम निर्माण होतो… उदात्त महामानव प्रत्येक काळात पैदा होतात. पण अशांच्या तुलनेत कितीतरी कमी पटीने. त्यामुळेच त्यांचं असणं, वागणं हे मुळी चमत्कार वाटतं-त्यांच्या जगण्याच्या काळात तसंच त्यांच्या हयातीनंतर ते दंतकथा होतात किंवा दैवतरूप होतात.  पुन्हा अशा महामानवाला देवत्व बहाल केलं की, त्याचे आचार-विचार व शिकवणं खुंटय़ास टांगून पुन्हा आपण स्वार्थी व अन्यायी वागायला मोकळे! साकल्याने विचार केला तर, बहुसंख्य असलेला माणूस देव जरी असला तरी खचितच पशूपण नाही.  सामान्य माणूस हा थोडा वाईट पण पुष्कळसा चांगला असतो, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. पण सामान्यांच्या या बऱयाचशा धवल पण थोडय़ाशा काळय़ा-करडय़ा प्रतिमेला आजच्या ‘सेल्फी(श)झम’च्या काळात काळं गडद एकरी बनवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे सामान्य माणूस हा संभ्रमित झाला आहे. माणसं ही अशीच वाईट व स्वार्थी असतात यावरचा त्याचा विश्वास वाढत चालला आहे.

हे किती भयावह आहे? ते खरं नाहीय. माणूस हा निखळ माणूस आहे. प्रसंगी त्याची पशूवृत्ती उफाळून येत असली तरी तो मूलतः सत्प्रवृत्त आहे. त्याला उदात्ततेची व चांगुलपणाची ओढ आहे. तो प्रसंगी इतरांच्या दु:खानं कळवळतो, कधी स्व स्वार्थावर मात करीत इतरांसाठी स्वार्थत्याग करतो. देश, धर्म, माणुसकी व अर्थातच कुटुंबासाठी सर्वोच्च बलिदानही करू शकतो. इतर माणसे भलेही वाईट वागू देत, प्रसंगी आपणास हानी पोचू देत, पण आपलं निखळ माणूसपण जपत वागणाऱया माणसांची ही लेखमाला म्हणजे ‘माणुसकीच्या गोष्टी’. दर पंधरा दिवसाला मी अशी माणसे, त्यांची उदात्त व माणुसकी आणि त्या मागचे तत्त्वज्ञान मी सांगून आपल्या सर्वांच्या मनातील माणुसकीचा दीप अधिक उजवळविण्याचा प्रयत्न करणार आहे. एकमेकांशी हितगुज करीत साथीनं आपण सारे थोडं अधिक चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करूया.