|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किल्ले रायगडावर येणाऱया पर्यटकांवर करडी नजर

किल्ले रायगडावर येणाऱया पर्यटकांवर करडी नजर 

प्रतिनिधी/ महाड

किल्ले रायगडावर 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही उत्साही तरुण पर्यटक गडावर येऊन मद्यप्राशन करत असल्याचे वृत्त पसरले होते. या वर्षी त्याची वेळीच दखल घेऊन महाडमधील दुर्गा वाहिनी या महिलांच्या संघटनेने गडावर येणाऱया प्रत्येक पर्यटकांची तपासणी केली. तसेच मद्यप्राशन करणाऱयांवर करडी नजर ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार यावर्षी घडला नाही. दुर्गा वाहिनीच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. गडावर येणाऱया पर्यटकांकडूनही चांगला प्रसिसाद मिळल्याचे दुर्गा वाहिनीच्या श्रीमती दीपाली दाते यांनी सांगितले.

  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रामाचे आयोजन केले जाते. त्यासाठी कोकणातील पर्यटनस्थळांना अधिक पसंती दिली जाते. त्याच बरोबर हौशी पर्यटकांकडून गडकिल्ल्याचा वापर देखिल केला जातो. किल्ले रायगडावर गेल्या दोन वर्षांपूर्वी काही उत्साही तरुणांनी 31 डिसेंबरला साजरा करताना गडावरील पावित्र्याचा भंग केल्याचे समजले होते. मात्र त्याची दखल महाडमधील दूर्गा वाहिनी या महिला संघटनेने घेतल्या नंतर गेल्या दोन वर्षापासून गडावर मद्यप्राशन करणे बंद झाले. येणारे प्रत्येक वाहान तपासले जात होते. त्याच बरोबर तरुणांना गडाचे महत्व आणि पावित्र्य राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. पर्यटकांनी देखिल दुर्गावाहिनीच्या उपक्रमाचे स्वागत करुन सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असल्याचे श्रीमती दाते यांनी सांगितले.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातून जाणारे प्रत्येक वाहन तपासण्यात आले. एखाद्या वाहानांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्यास त्या ताब्यात घेण्यात आल्या. त्याचा अतिशय चांगला परिणाम झाल्याचे श्रीमती दाते यांनी सांगितले. दुर्गा वाहिनीच्या श्रीमती रचना जोशी, सीमा बेंद्रे, लक्ष्मीबाई शेडगे, वनिता शेडगे, रसवंती बेंदुगडे, सुरश्री जोशी, कल्याणी कदम या सर्व रणरागिणी या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या. वाहानांची तपासणी बरोबर रात्रीच्या वेळी हातामध्ये काठय़ा घेऊन या सर्व रणरागिणी महिलांनी गडाची पहाणी केली.