|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त

चिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त 

प्रतिनिधी/ चिपळूण

औषधी गुणधर्म असलेल्या आणि परदेशात मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या दुर्मीळ अशा रक्तचंदनाचा आणखी 80 लाख रूपयांचा साठा येथील वनविभागाने शनिवारी रात्री जप्त केला असून आतापर्यंत 1 कोटी 20 लाख रूपयांचे रक्तचंदन जप्त झाले आहे. आणखी लपवून ठेवलेला मोठा साठा सापडण्याची शक्यता असून तस्करीचा संशय येऊ नये, म्हणून सोफ्यातून ती केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याचा सूत्रधार असलेल्या इसा हळदे याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाने खास पथक तैनात केले असल्याचे वृत्त आहे.

 राज्यात रक्तचंदन मिळणे दुर्मीळ असतानाच काही दिवसांपूर्वी गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कमधील अलमका इमारतीतील समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीच्या गाळय़ात टाकलेल्या धाडीत रक्तचंदनाचे सुमारे 40 लाख रूपये किंमतीचे 92 नग जप्त केले. त्यामुळे येथे खळबळ उडाली असतानाच आणखी साठा मिळत आहे. यातील मुख्य सूत्रधार इसा हळदे हा गायब असतानाही वनविभागाचे अधिकारी मिळत असलेल्या माहितीनुसार धाडी टाकून हा साठा जप्त करत आहेत.

  गोवळकोट रोड येथील चिकटे नामक व्यक्तीच्या जमिनीत मेमन नामक व्यक्ती इमारत उभी करत असून या इमारतीत मोठा साठा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने शनिवारी रात्री 11.30 वाजता येथे छापा मारला. यावेळी अधिकारी चकीत होतील, असा प्रकार उघडकीस आला. येथे तब्बल 37 सोफे आढळून आले. त्यामुळे या सोफ्यांचा संशय आला. यातील एक सोफा फोडून पाहिला असता त्यात चंदनाचे ओंडके असल्याचे दिसून आले. त्यामुळे वनविभागाने हे सर्व सोफे ताब्यात घेतले. रविवारी हे सर्व सोफे फोडण्यात आले. यावेळी प्रत्येक सोफ्यात 3 ते 4 ओंडके अगदी पद्धतशीरपणे लॉक करून ठेवण्यात आले होते. वाहतुकीदरम्यान ते हळू नयेत, म्हणून त्याला पट्टी मारण्यात आली होती. त्यामुळे ही पद्धत पाहता गेल्या अनेक महिन्यापासून ही तस्करी होत असल्याचे तसेच त्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे वनविभाग त्या दृष्टीने तपास करीत आहे.

  सोफ्यावर कोड

तस्करी करण्यासाठी परिपूर्ण केलेल्या सोफ्यावर त्या सोफ्याचे चित्र छापून त्या खाली काही कोड वापरण्यात आले होते. यातील सर्व कोडचा उलगडा होत नसला तरी त्यावर लिहिलेल्या 3 सीट, 4 सीटवरून त्यात तितके ओंडके असल्याचे स्पष्ट होत आहे. वनविभागाने आतापर्यंतच्या धाडीत 312 ओंडके जप्त केले असून ते सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहेत. त्याची किंमत 1 कोटी 20 लाख इतकी आहे.

  आणखी साठा असण्याची शक्यता

यातील मुख्य सूत्रधार इसा हळदे हा गायब असला तरी वनविभाग मिळत असलेल्या माहितीनुसार, छापा मारून रक्तचंदन जप्त करत आहे. त्यामुळे आणखी मोठा साठा असण्याची शक्यता वर्तवली जात असून इसा हळदेच्या अटकेनंतर आणखी साठा व त्याचे साथीदार मिळण्याची शक्यता आहे.

हळदेच्या शोधासाठी खास पथक

हळदे हा गायब झाल्याने वनविभागाने त्याला हजर होण्याबाबतची नोटीस धाडली आहे. ही नोटीस त्याच्या पत्नीने घेतली आहे. मात्र तो सहजासहजी येईल, असे वाटत नसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाने खास पथक नेमले आहे. त्यामुळे तो लवकरच जाळय़ात सापडेल, असा विश्वास वनविभागाला आहे.

वनविभागाचे वरिष्ठ चिपळुणात

येथील वनविभागाने ही जिल्हाभरातील सर्वात मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी कोल्हापूर येथील दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी वसंत भोसले हे येथे आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या फिरत्या पथकाचे शहाजी पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांच्यासह 3 अधिकारी व 12 कर्मचारी या यशस्वी कामगिरीत कार्यरत आहेत.