|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कॉलेज युवकाला स्टिकने मारहाण

कॉलेज युवकाला स्टिकने मारहाण 

प्रतिनिधी/ मालवण

पूर्ववैमनस्यातून वायरी येथील कॉलेज युवक मोहित मिलिंद झाड (17) याला बेसबॉलच्या स्टीकने स्कुबा व्यावसायिक सतीश आचरेकर आणि अन्य दोघा साथीदारांनी बंदरजेटीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत मोहित याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

 याप्रकरणी मनाली झाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी त्या मालवण बंदरजेटी येथे मोहितसोबत दुचाकीवरून आल्या. तेव्हा मागून आलेल्या तीन युवकांनी मोहितला बेसबॉलच्या स्टिकने मारहाण करण्यास सुरुवात केली. आपण त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता सतीश आचरेकर याने आपल्यालाही धक्काबुक्की केली. तसेच मोहितला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. आपण आरडाओरड केल्यावरही ते तिघे मोहितला मारहाण करतच होते. या मारहाणीत मोहित याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मोहितला काही नागरिकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर
प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले.

 दरम्यान, मारणहाणीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात वायरी-दांडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. मोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

‘त्या’ युवकांचा शोध सुरू

मोहितला मारहाण करणाऱया तिघाही युवकांचा शोध घेण्यात येत होता. तिघाही युवकांच्या घर आणि हॉटेल परिसरात त्यांचा शोध घेतला जात होता. पोलीस ठाण्यात भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, नगरसेवक गणेश कुशे, श्याम झाड, मिलिंद झाड, अविनाश सामंत, लारा देसाई, शिवसेना उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रुपेश कुर्ले, प्रसाद आडवणकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शनिवारच्या वादाचा राग

 वाहनाला बाजू देण्याच्या कारणावरून शनिवारी वायरी केळबाई येथील अरुंद रस्त्यावर मालवणातील स्थानिक लक्झरीचालक व सतीश आचरेकर यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाहन मागे घेण्याची विनंती केल्याचा राग आल्याने लक्झरी चालकाच्या कानशीलात आचरेकर याने लगावल्याने हा वाद झाला होता. याप्रकरणी लक्झरीचालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र, त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱयाने तक्रार न घेताच त्याला माघारी पाठविले होते. या वादाचा राग आचरेकर याने आपल्या डोक्यात ठेवून मोहितला मारहाण केल्याचा आरोप वायरी परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच पोलीस अधिकाऱयाने तक्रार न घेतल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Related posts: