|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँग्रेसकडे 40 मतदारसंघात उमेदवार आहेत

काँग्रेसकडे 40 मतदारसंघात उमेदवार आहेत 

प्रतिनिधी/ मडगांव

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे चाळीसही मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यामुळे इतर पक्षाकडे युती करण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, युती करायची की नाही, या संदर्भातील अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फातोर्डा गट काँग्रेसच्या कार्यकर्त्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत लुईझिन फालेरो यांनी वरील माहिती दिली. फातोर्डा गट काँग्रेसने फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या विरूद्ध दहा कलमी आरोपपत्र दाखल केले. त्याचबरोबर फातोडर्य़ाच्या विकासाबद्दल काँग्रेसची धोरणे काय असतील, याचा मसुदाही प्रसिद्ध केला आहे.

या पत्रकार परिषदेला फातोर्डा गट काँग्रेसचे अध्यक्ष जोजफ सिल्वा, अविनाश तावारीस, ऍथल लोबो, गोन्झाक रिबेलो, कामिल बार्रेटो इत्यादी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात फातोडर्य़ाचा विकास साधण्यात आमदार विजय सरदेसाई यांना अपयश आल्याचा आरोप यावेळी जोसेफ सिल्वा यांनी केला. त्याचबरोबर मडगाव नगरपालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार रोखणे देखील त्यांना शक्य झाले नसल्याचा दावा केला.

यावेळी लुईझिन फालेरो यांनी सर्व मतदारसंघातील गट समित्याकडून विकासाचा मसुदा घेतला जाईल व त्याप्रमाणे जाहीरनाम्यात या मसुदय़ाचा वापर केला जाईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्यावर टीका करण्याचे टाळले.

आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या जाहिरनाम्यात जी आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता करण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.