|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कॅशलेसच्या प्रोत्साहनासाठी आज डिजीधन मेळावा

कॅशलेसच्या प्रोत्साहनासाठी आज डिजीधन मेळावा 

ग्राहकांना मिळणार कॅशलेस व्यवहारांची माहिती

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात मेळाव्याचे आयोजन

मेळाव्यात व्यापाऱयांचा सहभाग

मुंबई / प्रतिनिधी

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आज, मंगळवारी डिजीधन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात सर्वसामान्य ग्राहक तसेच रिक्षा- टॅक्सीचालक, रास्तभाव दुकानदार आदींना सुरक्षित डिजिटल व्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी सोमवारी येथे दिली.

मेळाव्यात विविध वस्तू आणि सेवांचा समावेश असलेले 50 स्टॉल्स उभारण्यात येतील. या स्टॉल्सवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ, कापड, हस्तकला इत्यादींची विक्री होईल. मेळाव्यात खरेदी-विक्रीचा संपूर्ण व्यवहार हा डिजिटल  स्वरूपात होईल. येथे ग्राहकांना आणि व्यापाऱयांना रोख रक्कम वापरता येणार नाही. डिजिटल व्यवहारासाठी ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार पेमेंट, यूपीआय, यूएसएसडी इत्यादींद्वारे देवाणघेवाण करता येईल, असे वंदना कृष्णा यांनी सांगितले. डिजिटल व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी मेळाव्यात वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

डिजीधन मेळाव्यात कॅशलेस व्यवहाराच्या संदर्भातील ग्राहकांच्या शंका दूर केल्या जातील. कॅशलेस व्यवहाराबाबत व्यापारी आणि ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. मेळाव्यात ग्राहकांना डिजिटल पेमेंटच्या सुविधा डाऊनलोड करून दिल्या जातील. यूपीआय, एईपीएस, यूएसएसडी आणि रूपे कार्डद्वारे व्यवहार कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल, असे वंदना कृष्णा यांनी सांगितले.

दिवसभर चालणाऱया या मेळाव्यात नागरिकांना बँकांमध्ये नवीन खाते उघडण्याची प्रक्रिया, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे, आधार नोंदणी, आधार नोंदणीचे नूतनीकरण, बँक खात्याशी आधारकार्ड सिडींग करणे इत्यादी माहिती उपलब्ध करून दिली जाईल. डिजीधन मेळाव्यात सहभागी होणाऱया नागरिकांनी ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन वंदना कृष्णा यांनी केले. डिजीधन मेळाव्यात बँकिंग, ऑईल, कृषी, दळणवळण, मोबाईल वॉलेट ऑपरेटर, परिवहन, व्यापारी संघटना, आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटर आणि रास्त वस्तू विक्रेता संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिधन मेळाव्याची वैशिष्टय़े

लकी ग्राहक योजनेतंर्गत मेळाव्यात लकी ड्रॉ काढला जाणार

विजेत्या ग्राहकाच्या खात्यावर एक हजार रूपये जमा होणार

लहान-मोठय़ांसाठी घोषवाक्य स्पर्धा, विजेत्यांना बक्षीस मिळणार

डिजिटल व्यवहार सुरळीत होण्यासाठी वाय-फाय व्यवस्था

येत्या 7 जानेवारीला पुण्यात होणार डिजीधन मेळावा

Related posts: