|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आरोग्य खात्याला नवे बळ

आरोग्य खात्याला नवे बळ 

111 नवीन आरोग्य संस्थांसाठी 1 हजार 332 पदांना मान्यता

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

मेळघाटात गावप्रमुखांना प्रशिक्षण

मुंबई / प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी 111 नवीन आरोग्यसंस्थांना मंजुरी देण्यात आली आहे. या संस्थांसाठी 1 हजार 332 पदे नव्याने निर्माण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी येथे दिली.

मेळघाटच्या आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी गावप्रमुखांची मदत घेण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मेळघाटातील 350 गावप्रमुखांना आरोग्य प्रशिक्षण दिले जात आहे. आदिवासी भागातील बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यासाठी रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार घ्यावेत यासाठी गावप्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासाठी गावप्रमुखांना प्रति रूग्ण 200 रूपये मानधन देण्यात येणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

आरोग्यसेवेला अधिक बळकटी देण्यासाठी आरोग्य खात्याने घेतलेल्या निर्णयांची माहिती डॉ. सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात नव्याने 74 आरोग्य उपकेंद्र, 20 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रूग्णालय, तीन उपजिल्हा रूग्णालय, दोन जिल्हा रूग्णालय, चार स्त्री रूग्णालय आणि सहा ट्रामा केअर युनिट अशा 111 नवीन आरोग्यसंस्थांना मंजुरी दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

सांगलीसह ठाणे, नाशिक, गोंदिया, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नंदूरबार, जळगाव या जिल्हय़ातील गावांमध्ये एकूण 74 आरोग्य उपकेंद्रे सुरू केली जातील. उपकेंद्रासाठी आरोग्यसेवक, अंशकालीन स्त्राr परिचर अशी 222 नवीन पदे निर्माण केली जातील. तर कोल्हापूर, सातारासह नाशिक, नंदूरबार, अमरावती, गडचिरोली जिल्हय़ातील 20 गावांत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येतील. या आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी या पदासह एकूण 240 पदे नव्याने स्थापन करण्यात येतील, अशी माहितीही डॉ. सावंत यांनी दिली.

दरम्यान, शासकीय सेवेत राहून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अधिकाऱयांची जेथे नियुक्ती असते तेथील पदे रिक्त राहतात. अशा रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकाऱयांची नेमणूक करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात येत्या तीन महिन्यात 545 रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे डॉ. सावंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

नव्या आरोग्य संस्था

आरोग्य उपकेंद्र…………………74

प्राथमिक आरोग्य केंद्र…………….20

ग्रामीण रूग्णालय…………………..01

उपजिल्हा रूग्णालय……………….03

जिल्हा रूग्णालय…………………..02

स्त्री रूग्णालय……………………….04

ट्रामा केअर युनिट………………06

Related posts: