|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सैराटच्या कन्नड रिमेकला मनासु मालिगेची ओळख

सैराटच्या कन्नड रिमेकला मनासु मालिगेची ओळख 

9 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई / प्रतिनिधी

‘सैराट’ चित्रपट हा 2016 या वर्षातील सर्वात हीट चित्रपट ठरला. बॉलीवूड चित्रपटांनाही सैराटने मागे टाकले. परश्या आणि आर्चीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. संपूर्ण सिनेसृष्टीला याड लावणाऱया ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगु भाषांमध्ये होणार आहे हे आता जगजाहीर आहे. यापैकी सैराटचा कन्नड रिमेक प्रदर्शनाच्या वाटेवर असून मनासु मालिगे या नावाने तो प्रदर्शित होणार आहे. येत्या 9 फेब्रुवारीला हा कन्नड रिमेक प्रदर्शित होणार आहे.

सैराटचा कन्नड रिमेक असलेल्या मनासू मालिगे या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. एस. नारायण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आर. व्यंकटेश यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांचे सर्व रिमेक हक्क आर. व्यंकटेश यांनी विकत घेतले आहेत. तर हिंदी रिमेकचे हक्क धर्मा प्रोडक्शनकडे आहेत. आर्चीच्या भूमिकेत पुन्हा एकदा रिंकु राजगुरु पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या कन्नड रिमेकबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमांमधील खलनायकी भूमिका साकारणारे प्रसिद्ध कलाकार सत्या प्रकाश यांचा चिरंजीव निशांत प्रकाश या चित्रपटात परश्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रिंकु राजगुरुने या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले असून यंदा ती दहावीच्या परिक्षेची तयारी करत आहे. परिक्षा झाल्यानंतर नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे. या चित्रपटातही रिंकु झळकणार आहे.

या चित्रपटाने 100 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतकी भरभक्कम कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. अनेक बॉलीवूड चित्रपटांच्या बॉक्सऑफीस कमाईवर मोठा परिणाम झाला. बॉलीवूड कलाकारांनीही सैराटचे भरभरून कौतुक केले. सैराटला मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर दाक्षिणात्य भाषांमध्ये, हिंदी तसेच पंजाबीमध्येही सैराटचा रिमेक येणार आहे. या रिमेकमध्ये कोणत्या गोष्टी पाहायला मिळतील याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. आता या सर्व रिमेकमधील कन्नड रिमेक सर्वात आधी पूर्ण झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts: