|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्हाय गॉड वोंट गो अवे

व्हाय गॉड वोंट गो अवे 

मी अध्यात्म आणि विज्ञान हा लेख जरा भीतभीतच लिहिला होता. आज काल दुसऱयाचे विचार नीट न वाचताच आणि त्याच्यावर विचार न करताच प्रतिक्रिया व्यक्त करणाऱयांनी आणि ती प्रतिक्रिया वैचारिक पातळीवरून शारीरिक पातळीवर आणण्याची सवय वाढीस लागली आहे. याला बऱयाच मोठय़ा प्रमाणात स्वतःला सहिष्णुतेचा अवतार समजणारे राजकीय नेतृत्व जबाबदार आहे, हेही आपण पाहतोच आहोत. सुदैवाने माझ्या लेखास जो प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. बहुतेक वाचकांनी मी याविषयी जे संशोधन सुरू आहे, त्याबद्दल वारंवार लिहावे, असा आग्रह धरला. मी गेली काही वर्षे माझ्या आगामी ‘देव, धर्म, उत्क्रांती आणि विकृती’ या ग्रंथाच्या लेखनाची तयारी करीत आहे. त्यामुळे माझ्या वाचनात या विषयासंबंधीची काही पुस्तके आली. त्या पुस्तकांचा या स्तंभातून मराठी वाचकांना  परिचय करून द्यावा, असे मी ठरवले आहे. ही सर्व पुस्तके व त्याशिवाय या विषयासंबंधित इतरही पुस्तके ऍमेझॉन डॉट कॉमवरून मागवता येतात.

आता ‘व्हाय गॉड वाँट गो अवे’ हे पुस्तक बघू. जोपर्यंत माणूस अस्तित्वात आहे, तोपर्यंत देवाचे अस्तित्व टिकून राहणार, ते का आणि कसे यासंबंधीची चर्चा या पुस्तकात वाचायला मिळते. सर्व माहिती शास्त्राrय पुरावे आणि वैज्ञानिक प्रयोग यांच्यावर आधारित आहे. या पुस्तकाचे लेखक अँड्रय़ू न्यूबर्ग एम. डी. आणि युजीन दाक्विल एम. डी. पीएच. डी. असून त्यांचे वैज्ञानिक लेखन वाचकाभिमुख करण्याचे काम व्हिन्स राऊझ यांनी केले आहे. न्यूबर्ग आणि दाक्विल हे मेंदू आणि चेतासंस्था म्हणजे ब्रेन आणि न्यूरो सिस्टीम यांचे अभ्यासक आहेत. त्यांच्या  पुस्तकाचे उपशीर्षक ब्रेन सायन्स (मेंदू विज्ञान) आणि द बायॉलॉजी ऑफ बीलिफ  (श्रद्धेमागचे जीवशास्त्र) असे आहे.

या पुस्तकामध्ये श्रद्धेबद्दलचे वैज्ञानिक संशोधन, श्रद्धा कशी निर्माण झाली, ती उत्क्रांतीमध्ये टिकून राहण्यामागची कारणे, मुख्य म्हणजे ती उत्क्रांतीत टिकून राहिली. कारण मानवी जमातीचे अस्तित्व काही प्रमाणात श्रद्धेवर का आणि कसे अवलंबून होते, याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आढळते. या पुस्तकाची सुरुवात मेंदूचे कार्य कसे चालते, हे अत्यंत सोप्या भाषेत वाचकाला समजावून देत होते. याचे कारण मानवाच्या सर्व भावनांचे नियंत्रण आणि त्या प्रकट करण्याची प्रक्रिया मेंदूमार्फत घडत असते. त्यामुळेच पुढच्या वेगवेगळय़ा प्रकरणांमधून मेंदूसंबंधी जे उल्लेख येतात तिथे सामान्य वाचक अडखळू नये, याकरिता हे प्रकरण उपयुक्त ठरते. मेंदूत कुठली केंद्रे कुठल्या भावनांचे नियंत्रण करतात. मेंदूची रचना कशी आहे, मेंदूशी संबंधित रसायने कोणती, त्यांचे कार्य कसे चालते, अशा विविध प्रकारची माहिती त्या पहिल्या प्रकरणात आपल्याला मिळते. आपले मन ही आपल्या मेंदूची निर्मिती आहे, हेही आपल्याला इथे स्पष्टपणे सांगितले जाते. खरं तर पहिली दोन प्रकरणे आपला मेंदू आणि आपल्या जाणिवा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करतात.

कुठल्याही धर्मात मिथ्यक यांना फार महत्त्व असते. मिथके किंवा पुराणकथा ही धर्मग्रंथाची एक महत्त्वाची बाब असते. इंग्रजीमध्ये यांना ‘मिथ्स’ असे म्हणतात. मराठीत मिथक, मिथ्यकथा अथवा पुराणकथा असे शब्द या ‘मिथ्य’ साठी वापरले जातात. डी. डी. कोसंबीचे ‘पुराणकथा आणि वास्तव्य’ हे पुस्तक या दृष्टीने वाचनीय आहे. मिथ्यकथांना धार्मिक महत्त्व का प्राप्त झाले, जगातील सर्वच संस्कृतींना अशा कथा रचाव्या, असे का वाटले, धर्माचा उगम व्हायला ही मिथके कशी कारणीभूत ठरली, हा मानव शास्त्राrय अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘व्हाय गॉड वोंट गो अवे’ मध्ये या सर्व बाबींचा ऊहापोह केलेला आढळतो. अशी मिथके निर्माण करणे, ही माणसांची मानसिक गरज आहे आणि त्यांची आपल्या दैनंदिन व्यवहारात आवश्यकता नसली तरी सामाजिक सामूहिक जीवनात गरज आहे, हे या प्रकरणात खुलासेदार स्पष्ट केलेले आहे.

कुठलाही धर्म घेतला तर त्यात कर्मकांडांना खूप महत्त्व असते. जर तर्कशुद्ध विचार केला तर या कर्मकांडामधील फोलपणा स्पष्टपणे कळून येतो. पण वैयक्तिक मन आणि सामूहिक मनोधारणा यांचा दरवेळी मेळ बसतोच असे नाही. सर्वच व्यक्ती वैयक्तिक पातळीवर तर्कशुद्ध, विचार करतात किंवा करू शकतात, असेही नाही. वेगवेगळय़ा सामाजिक घटकांना एकत्र बांधण्यात धार्मिक कर्मकांडाचा फार मोठा वाटा असतो. सर्वसाधारणपणे आपण एकटय़ाने सार्वजनिक ठिकाणी ज्या गोष्टी सहसा करीत नाही, त्या गोष्टी आपण जेव्हा मानवी समूहाचा एक भाग म्हणून वावरतो तेव्हा करू लागतो. सार्वजनिक आरतीत सूर मिळवणे, पालखी सोहळय़ामध्ये अनवाणी चालणे आदी गोष्टी आपण समूहाचा एक भाग म्हणून सहज करतो. ही कर्मकांडे बहुतेक वेळा एखाद्या मिथ्यकथेतून निर्माण झालेली असतात. धार्मिक सामाजिक कर्मकांडे आणि क्रिकेट किंवा चित्रपटगृहातील सामूहिक प्रतिक्रिया यांच्या चेत जीव शास्त्राrय मुळाशी जेव्हा शास्त्रज्ञ गेले तेव्हा मेंदूच्या दृष्टीने त्या प्रतिक्रिया समानधर्मी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रतिक्रियांचा उगम मेंदूत जिथे होतो ते भाग आणि ती रसायने एकाच ठिकाणी निर्माण होतात. या प्रक्रिया जीव रासायनिकच असतात. हे या प्रकरणात स्पष्ट होते. इथेच श्रद्धेच्या उगमाचीही कारणे स्पष्ट होतात.

‘मिस्टिसिझम 1 बायॉलॉजी ऑफ ट्रान्सेंडन्स’ हे प्रकरण आपल्याकडच्या बऱयाच व्यक्तींना महत्त्वाचे वाटेल. या प्रकरणात लेखक भावातीत अवस्था, साक्षात्कारादी गूढ अनुभव यांच्या आणि मेंदूचा संबंध स्पष्ट करताना दिसतात. वेगवेगळय़ा धर्मातील संत, महंत आणि प्रेषित यांच्या अनुभवातील साम्य, भावातीत अवस्थेत स्थल कालाचे भान विसरणे, विश्वाशी दातात्म्य पावणे या गोष्टी मेंदूशी संबंधित आहेत. याचे पुरावे ते आपल्यापुढे सादर करतात. साक्षात्कार, मग तो कोणत्याही धर्मातील, पंथातील व्यक्तीला झाला तरी त्याचे स्वरूप अगदी एकसारखेच असते. आपल्या दृष्टीने अत्यंत पापी आणि भ्रष्ट तसेच नास्तिक व्यक्तींनाही असे अनुभव येऊ शकतात. तसेच ज्यांना अपस्माराचे झटके येतात, त्यांची अशी झटके येण्यापूर्वीची अवस्था आणि साक्षात्कार झालेल्या व्यक्तीची अवस्था यात अजिबात फरक नतो, हे का त्याचेही स्पष्टीकरण इथे आपल्याला वाचायला मिळते.

इथून ते धर्माच्या निर्मितीकडे वळतात. धर्माचा आणि अध्यात्माचा किंवा सद्वर्तणुकीचा काही संबंध नाही. ती मानवी समूहांची गरज होती. समाज एकत्र बांधण्यासाठी जे नीतीनियम बनविण्यात आले, त्यांचेपासून समाजातील सर्वच व्यक्तींनी करावे, यासाठी मग धर्माला सर्वशक्तीमान परमेश्वराची फोडणी देण्यात आली. देवाच्या धाकामुळे लोक धार्मिक नियम मुकाटय़ाने पाळू लागले, हे
सांगून देव आणि धर्म ही जशी सामाजिक गरज होती तशीच ती मानवी वैयक्तिक गरज होती. त्याचे पटेलसे स्पष्टीकरण इथे आपल्याला वाचायला मिळते. अत्यंत सुस्पष्ट विचार, भरपूर पुरावे, जीवशास्त्रासह मानव शास्त्राrय कथन, अत्यंत सोपी आणि सहज समजेल अशी भाषा, यामुळे ‘व्हाय गॉड वोंट गो अवे’ हे पुस्तक अतिशय वाचनीय बनते. सध्याच्या धार्मिक अतिरेकाच्या काळात प्रत्येक विचारी, विवेकी आणि सुबुद्ध अशा व्यक्तींनी वाचावे असे हे पुस्तक आहे.