|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नेमके काय घडणार ?

नेमके काय घडणार ? 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी रणसंग्रामाची अंतिम तारीख जाहीर होऊ शकते. अशी परिस्थिती असतानाच एकमेकांवर आरोपांचे वार आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आसुसलेले आहेत. यामधून स्वकियांचीही सुटका नाही. गेली 25 वर्षे मांडीला मांडी लावून बसणारेही रणसंग्रामात एकमेकांवर वार करण्यास सज्ज झाले आहेत. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. याआधी भाजपने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविताना शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेची होणारी निवडणूक ही भाजपपेक्षा शिवसेनेसाठी जास्त महत्त्वाची आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून भाजपही सेनेसोबत पालिकेत सत्तेत आहे. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपने निवडणूक लढविताना वर्चस्व मिळविल्याने भाजपने राज्यातही शिवसेनेला वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केला. मग सेनेच्या ताब्यात असणाऱया महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे आरोप असो किंवा मुंबईतील विविध विकासकामांचा विषय असो शिवसेना आणि भाजपा राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असले तरी युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील वाद अनेकदा चव्हाटय़ावर आल्याचे बघायला मिळाले.

शिवसेनेसाठी आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे. जर या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक यश मिळाले नाही तर पुन्हा शिवसेनेला मुंबईतील आपले राजकारणातील वर्चस्व निर्माण करणे कठीण जाणार आहे, कारण एकीकडे मुख्यमंत्री शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगत असताना दुसरीकडे भाजपचे नेते मात्र स्वबळावर लढण्याची वेळोवेळी वक्तव्ये करत आहेत. विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपने शिवसेनेसोबत बोलणी सुरू ठेवत एकीकडे स्वबळावर लढण्याची चाचपणी केली होती आणि त्यानुसार भाजपने व्यूहरचना केली होती असे बोलले जाते आणि सेना मात्र गाफिल राहिली होती. शिवसेना जरी भाजपशी युती करण्याची भाषा करणार असली तरी शिवसेना बोलणी करताना स्वबळावर लढण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी नागपूर अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची बोलणी ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहतील. मात्र युती काही होणार नसल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुंबईतील सर्व शिवसेना शाखांना भेटी देताना स्वत: स्थानिक पातळीवरचा आढावा घेतला. शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन तुमचे स्थानिक पातळीवरील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवा. फक्त पक्ष म्हणून विचार करा आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करा, असे सांगितले. पक्षांतर्गत मतभेद बाजूला सारून शिवसैनिकही जोरात कामाला लागल्याचे चित्र ठाकरे यांच्या भेटीनंतर पहायला मिळाले, ते निवडणुकीपर्यंत कायम राहिले तर मात्र हे चित्र कायम राहील का हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

ncp-and-congress

दुसरीकडे भाजपनेही स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली असून सर्व समाजाच्या जातीच्या लोकांना जवळ करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वत: मुख्यमंत्री मुंबईतील अनेक भागात भेटी देत आहेत. मुंबईतील उत्तर भारतीयांची संख्या लक्षात घेता कजरी महोत्सवासारख्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचे आयोजनही केले जात आहे. त्यातच मुख्यमंत्री स्वत: महिनाभराच्या फरकाने एकाच विभागात दोन ते तीनवेळा एका आमदाराच्या मतदारसंघात येणे ही मोठी गोष्ट आहे. अन्यथा एखाद्या आमदाराच्या पूर्ण 5 वर्षाच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री एकदाही मतदारसंघात येत नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रभर फिरले त्याप्रमाणे मुंबईतील भागात मुख्यमंत्र्यांनी भेटी द्यायला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विकासकामांचा शुभारंभ करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. शिवसेनेनेही स्थानिक पातळीवर जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजप युती होणार की नाही याची सध्या स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार वाट बघत आहेत त्यामुळे अद्याप स्थानिक पातळीवरील नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

इच्छुकांनी तर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक आमदारांच्या कार्यालयात रोज कोणाच्या ना कोणाच्या कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ होत आहे. मकर संक्रांतीपासून हळदीकुंकू समारंभाला सुरुवात होते, मात्र कधी नव्हे ते महिलांसाठी राखीव झालेल्या वॉर्डात आतापासूनच हळदीकुंकू समारंभाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीतून नुकत्याच शिवसेनेत आलेल्या एका नगरसेविकेने तर गेल्याच आठवडय़ात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करताना चक्क महिलांना चांदीचे नाणे भेट दिले. त्यामुळे निवडणुका जवळ येतील तशा अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरताना उमेदवार दिसतील. तर कधी नव्हे ते यंदा पतंग महोत्सव, क्रिकेट महोत्सव, कबड्डी महोत्सवाचे दिमाखदार आयोजन केले जात आहे.

राष्ट्रवादीने आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होत नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगलाच फायदा उठवत अनेकांच्या गाठीभेठी घेत प्रचाराला सुरुवात केली. आघाडी होत नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र कॉंग्रेसमधील गुरुदास कामत आणि मुंबई अध्यक्ष संजय निरूपम गटातील वाद निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची चाहुल स्थानिक पातळीवरील राजकारणावरून आज तरी दिसते. भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने ऐनवेळी दोन्ही पक्ष संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी युतीची बोलणी सुरू ठेवत असतानाच युती फिस्कटल्याची घोषणा करतानाच ऐनवेळी उमेदवारांची घोषणाही करतील. मात्र शिवसेना आणि भाजप युती मात्र होणार नाही. पण मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना आणि भाजप जोमाने कामाला लागणार यात मात्र शंका नाही.

Related posts: