|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मन हे भ्रमले जसे

मन हे भ्रमले जसे 

अर्जुन हा कसलेला सेनानी आहे. युद्धापूर्वी तो शत्रू सेनेचे निरीक्षण करण्याची जी इच्छा प्रकट करतो त्यातून त्याचा सावधपणा आणि आत्मविश्वास दोन्ही दिसून येतात. आता शत्रूसेनेत तो ज्यावेळी आपल्या सगळय़ा कूळ, गोत्रजाबरोबर पितामह भीष्म आणि आचार्य द्रोण यांना पाहतो, तेव्हा तो मनाने एकदम कोसळतो. तो
श्रीकृष्णाला यावेळी काय बोलतो त्याचे गीताईतील बोल असे –

कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुन । गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरड ।।  शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती । गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ।।  न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ।

अर्जुनापुढे अशी कोणती समस्या निर्माण होते की त्याचा सर्व आत्मविश्वास एकदम नाहीसा होतो? तो एकदम गलितगात्र होतो? या समस्येचे स्वरुप काय? युद्धाला पूर्ण तयारीनिशी उभा ठाकलेला अर्जुन अचानक आता काय करावे आणि काय करू नये या द्वंद्वात सापडतो.अर्जुनाची ही समस्या अपूर्व नाही असे सांगून लोकमान्य टिळक आपल्या सुप्रसिद्ध गीतारहस्य या ग्रंथात अर्जुनाशी साम्य दाखवणारी कोणती उदाहरणे देतात ते पहा -कर्माकर्म संशयाचे असले प्रसंग हुडकून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठय़ा कवींनी सुरस काव्ये आणि उत्तम नाटके रचिली आहेत. उदाहरणार्थ, प्रसिद्ध इंग्रज नाटककार शेक्सपियर याचे ‘हॅम्लेट’ नावाचे नाटक घ्या. डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅम्लेट याच्या चुलत्याने राजकर्त्या आपल्या भावाचा-म्हणजे हॅम्लेटच्या बापाचा – खून करून व हॅम्लेटच्या आईशी मोतूर (लग्न) लावून गादीही बळकावली होती. तेव्हा असल्या पापी चुलत्याचा वध करून बापाच्या ऋणातून पुत्रधर्माप्रमाणे मुक्त व्हावे, किंवा सख्खा चुलता, बाप आणि तक्तनशील राजा म्हणून त्याची गय करावी, या मोहात पडून कोवळय़ा मनाच्या तरुण हॅम्लेटची काय अवस्था झाली, आणि श्रीकृष्णासारखा योग्य मार्गदर्शक कोणी पाठीराखा नसल्यामुळे वेड लागून अखेरीस ‘जगावे का मरावे’ याची विवंचना करण्यातच बिचाऱयाचा कसा अंत झाला, याचे चित्र या नाटकात उत्कृष्ट रीतीने रंगविले आहे.

‘करॉयलेनस’ नावाच्या दुसऱया नाटकातही अशाच तऱहेचा आणखी एक प्रसंग शेक्सपियरने वर्णिला आहे. करॉयलेनस नामक एका शूर रोमन सरदारास रोमच्या लोकांनी शहराबाहेर घालविल्यामुळे तो रोमन लोकांच्या शत्रुंकडे जाऊन त्याना मिळाला व ‘तुम्हास मी कधीही अंतर देणार नाही’ असे त्याने त्यास अभिवचन दिले. नंतर काही काळाने या शत्रुंच्या मदतीने रोमन लोकांवर चाल करून मुलूख जिंकत जिंकत खुद्द रोम शहराच्या दरवाजापुढे त्याच्या सैन्याची छावणी येऊन पडली. तेव्हा रोमन शहराच्या स्त्रियांनी करॉयलेनसची बायको व आई यांना पुढे करून मातृभूमीसंबंधाने त्याचे कर्तव्य काय याचा त्यास उपदेश केला व रोमन लोकांच्या शत्रूस त्याने दिलेले अभिवचन त्यास मोडावयास लावले! लोकमान्यांनी वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाच्या समस्येचे स्वरूप असे वैश्विक आहे.

Related posts: