|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नोटाबंदीमुळेच रक्तचंदनाची तस्करी उघड!

नोटाबंदीमुळेच रक्तचंदनाची तस्करी उघड! 

चलनामुळे माल विक्री न झाल्याने झाला मोठा  साठा

प्रतिनिधी/ चिपळूण

संपूर्ण देशभर लागू करण्यात आलेल्या 500 व 1000 रूपयांच्या नोटाबंदीमुळेच येथे आलेल्या रक्तचंदनाला गिऱहाईक न मिळाल्याने त्याचा मोठा साठा झाला आणि त्यामुळेच ही तस्करी उघड झाली. मात्र मिळालेल्या चंदनाची नेमकी किंमत किती याबाबत वनविभागातच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र या तस्करीत सहभागी असलेल्या इसा हळदे याच्यासह अनेकजण गायब झाल्याची चर्चा सुरू आहे.

 औषधी गुणधर्म असलेल्या आणि परदेशात मोठय़ाप्रमाणात मागणी असलेल्या दुर्मिळ अशा रक्तचंदनाचे शहरातील गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कमधील अलमका इमारतीतील समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीच्या गाळय़ात सुरूवातीच्या धाडीत 40 लाख रूपये किंमतीचे 92 नग सापडले. त्यानंतर आणखी दोनवेळा वेगवेगळय़ा टाकलेल्या धाडीत आणखी नग सापडले. त्यामुळे आतापर्यंत 9 टनाचे 312 ओंडके जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 1 कोटी 20 लाख इतकी आहे. हे ओंडके सोफ्यामधून वाहतूक केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किंमतीबाबत संभ्रम

  राज्यभरातील ही अनेक वर्षातील पहिली कारवाई असल्याने तसेच रक्तचंदन कुठेही मिळत नसल्याने याच्या किंमतीबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. वनविभागाने जी किंमत ठरवली आहे ती काही पुस्तके व नेटवरून मिळालेल्या माहितीवरून ठरवली आहे. त्यामुळे राज्यात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची नेमकी किती किंमत होते याबाबत संभ्रम असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. मात्र ही किंमत काही कोटीत असू शकते असेही वरक यांनी स्पष्ट केले आहे.

  ही तस्करी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. काही कोटीचा माल आल्यानंतर त्याची तात्काळ विल्हेवाट लावली जात होती. मात्र मध्यंतरीच्या 500 व 1000 रूपयांच्या नोटाबंदीमुळे रक्तचंदन मोठय़ाप्रमाणात येथे उपलब्ध झाले. मात्र त्याला गिऱहाईकच न मिळाल्याने उचल झाली नाही. त्यामुळे मोठा साठा झाला. येत्या काही दिवसांत सर्व साठा पाठवला जाणार होता. तत्पूर्वीच वनविभागाने ही तस्कर उघड केली. यात इसा हळदे हा प्रमुख असला तरी त्यात अनेकांचा सहभाग आहे. त्यामुळे वनविभागाचा छापा पडताच हे सर्वजण गायब झाले आहेत. मात्र जोपर्यंत इसा सापडत नाही तोपर्यंत इतरांची नावे उघड होणे शक्य नाही.

दक्षिणेतून येत होता माल

  हा माल दक्षिणेतून येत होता, असे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तेथून इथपर्यंतच्या कनेक्शनमध्ये अनेकांचा सहभाग असणे स्वाभाविक आहे. मात्र वनविभाग या सर्वांपर्यंत पोहचू शकतो का, तेवढी यंत्रणा वनविभागाकडे आहे का, असे अनके प्रश्न उपस्थित होत असून याच्या मुळाशी गेल्याशिवाय तस्करीतील इतर व्यक्ती मिळणे कठीण आहे.

मोठी गुप्तता

 हे रक्तचंदन आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीसाठी नेले जाते. विशेषत: गल्फ देशांमध्ये या रक्तचंदनाला मोठी मागणी असून तेथे हा माल पाठवला जातो. मात्र त्यासाठी विशिष्ट पद्धतीची यंत्रणा राबवली जाते. ज्या व्यक्तीकडून माल पोहचवला जातो त्यावेळी समोरची व्यक्ती कोण असणार, याची कोणतीही कल्पना दिली जात नाही. तसेच जी व्यक्ती माल स्वीकारते त्या व्यक्तीलाही कोणाकडून माल आला हे कळत नाही. मात्र माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास टनामागे एक लाख रूपयांची रोकड मिळते. त्यामुळे साहजिकच त्या पटीत पैसे मिळत असल्याने काहीजण या व्यवसायात ओढले गेले आहेत.

    अनेक जागांचा शोध

  पूर्वी हा व्यवसाय कोकण खाडीकिनाऱयावर चालवला जात होता. मात्र एकाच जागी अनेक महिने व्यवसाय चालल्यास त्याचा तेथील रहिवाशांना संशय येऊन आपले पितळ उघडे होऊ शकते, अशी भीती इसा याच्यासह या व्यवसायात असणाऱयांना होती. त्यामुळे इसा हा सातत्याने नवनवीन व वस्तीपासून दूरवर असलेल्या जागांच्या शोधात होता. यासाठी त्याने अडगळीतील जागांनाही मोठे भाडे देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आपल्या जागेकडे जाण्यासाठी रस्ताही नाही अशा जागेला इतके भाडे इसा का देतो, असा प्रश्न अनेकांना पडत होता. त्यामुळे अनेकांनी आपल्या जागा नाकारल्याची माहिती पुढे येत आहे.