|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’

रत्नागिरीत कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीमध्ये कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’ची जिल्हा शाखा सुरू होत आहे. दामले विद्यालयाजवळील जोगळेकर कॉलनी येथे मातृस्मृतीमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. 5 जानेवारी रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात सकाळी 10.30 वाजता या शाखेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा सीए इन्स्टिटय़ुटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए एम. देवराजा रेड्डी, उपाध्यक्ष सीए नीलेश विकमसे, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहूल पंडित यांची उपस्थितीत होणार असल्याची माहिती रत्नागिरी शाखा अध्यक्ष सीए भुषण मुळ्ये, उपाध्यक्ष श्रीरंग वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतात सीए इन्स्टिटय़ुटची स्थापना 1949 साली झाली. इन्स्टिटय़ुटच्या 5 विभागीय कार्यालयांमार्फत व त्यांच्या अंतर्गत येणाऱया विविध शाखा, चॅप्टर, व स्टडी सर्कल्समार्फत सर्व कारभार चालतो. रत्नागिरी जिह्यामध्ये सीएची मुहूर्तमेढ सीए जी. वाय. लिमये, एन.एस. पटवर्धन व एच.एल. पटवर्धन यांनी रोवली. त्यानंतर आतापर्यंत जिह्यामध्ये 100 पेक्षा अधिक सीए कार्यरत झाले आहेत. त्यामुळे सीए इन्स्टिटय़ुटची शाखा आता सुरू करायला मान्यता प्राप्त झाली आहे. यापूर्वीचा टप्पा म्हणून 2005 साली चॅप्टरला परवानगी मिळाली होती.

रत्नागिरी शाखेतर्फे आयटी ट्रेनिंग, ओरिएंटेशन, जीएमसीएस इ. परीक्षा केंद्र आदी अनेक प्रकारची विविध प्रशिक्षणे उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थी संघटनेची शाखा स्थापन होऊ शकेल. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रश्न व शंकांचे समाधान करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

भविष्यात शाखेची स्वतःची जागा घेऊन त्यामध्येच असे विविध उपक्रम राबवण्याचा विचार पत्रकार परिषदेत सांगण्यात आला. याचबरोबर सीएनंतरच्या सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग सेंटर, कोर्सेसचे परिक्षा केंद्रही येथे सुरू करण्याचा मानस आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने व्यापारी व अन्य संघटनांच्या सहकार्याने काही जनजागृतीचे व प्रशिक्षणात्मक, शैक्षणिक व माहितीपर कार्यक्रम घेण्याचा विचार आहे. या पत्रकार परिषदेला रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए भुषण मुळ्ये, उपाध्यक्ष श्रीरंग वैद्य, सचिव अँथोनी राजशेखर, कोषाध्यक्ष अभिजित चव्हाण, कार्यकारिणी सदस्य बिपीन शाह, सुमेध करमरकर, आर.व्हि. संसारे, शैलेश हळबे, पायस राजशेखर, केदार करंबेळकर, प्रसाद आचरेकर उपस्थित होते.

विद्यार्थी, सीए यांना होणार फायदा

रत्नागिरीत सुरू होणाऱया या याशाखेचा फायदा सीए कोर्सच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे सीए झालेल्या व्यक्तींनाही याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी रत्नागिरीतच ठिकाणी होणार आहे. या कोर्ससाठी वयाचे बंधन, रिझर्वेशन आदी अटी नाहीत. विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच अभ्यासिका, सुसज्ज संदर्भ ग्रंथालय, स्टडी मटेरिअल व पुस्तके उपलब्ध होणार आहेत. तसेच येथे एकाच विषयावरील अनेक लेखकांची पुस्तकेही संदर्भासाठी उपलब्ध होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Related posts: