|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झंझावाती कारकिर्दीची पुनरावृत्ती करू

झंझावाती कारकिर्दीची पुनरावृत्ती करू 

सतीश चव्हाण/ कराड

गेली 20 वर्षे सलग निवडून येत नगरपालिकेत काम करतोय. 2001 साली नगराध्यक्षपद भूषवले. त्यावेळची कामे लोकहिताची आणि झंझावाती झाली. नागरिकांच्या लक्षात राहिली. आता 16 वर्षांनी पुन्हा उपनगराध्यक्ष झाल्यानंतर प्रचंड संख्येने लोक भेटले. त्यांच्याशी चर्चेत यावेळीही खूप अपेक्षा व्यक्त झाल्या. त्यामुळे 2001 सालच्या झंझावाती कारकिर्दीची पुनरावृत्ती करून कराडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नूतन उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी दिली.

जयवंतराव पाटील यांनी सोमवारी नगरपालिकेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्तीचे नेते राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी विनायक औंधकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी यादव यांच्यासह जनशक्तीचे नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, अतुल शिंदे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

जयवंतराव पाटील म्हणाले की, जनशक्ती आघाडीने निवडणुकीत जो जाहीरनामा कराडकरांना दिला होता, तो यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारच्या नव्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील भाजपाच्या सरकारचे सहकार्यही विकासासाठी घेण्यात येईल. नगराध्यक्षा भाजपाच्या असून त्यांचे सहकार्य विकासासाठी घेण्यात येईल.

मंडईत केंद्र सरकारच्या अनुदानातून नवीन मच्छी मार्केट मंजूर आहे. त्याचे टेंडर काढले असून लवकरच या कामाची सुरूवात करण्यात येईल. शिवाजी स्टेडियमपासून गांडुळखत प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याच्या कारपेटचे टेंडर काढले असून हेही काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मंडईत जनता व्यासपिठालगत पार्किंग आणि मल्टीपर्पज हॉलच्या इमारतीचा विचार असून यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. शिवाय नवीन मटण मार्केटची इमारतही बांधण्यात येईल. बुधवार पेठेत दोन नगरपालिकेच्या शाळा असून तेथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळय़ानजीक मल्टीपर्पज हॉलच्या उभारणीसही प्राधान्य देण्यात येणार आहे. जलतरण तलावाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

चोवीस तास पाणी योजनेचे काम 85 टक्के तर वाढीव भागातील भुयारी गटर योजनेचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. या योजना तातडीने कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्रिशंकू भागाच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. पक्ष न पाहता गावच्या विकासासाठी नगराध्यक्षांची मदत घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.