|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी 

प्रतिनिधी/ कराड

महावितरणच्या अधिकाऱयाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून झाल्याच्या घटनेचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. घटनास्थळाच्या परिसरासह कराड-विटा रोडवरील वेगवेगळय़ा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सोमवारी दिवसभर तपासले. अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संतोष चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींद्वारे तपास सुरू केला आहे. विजय रामचंद्र पवार (वय 28, मुळ रा. कराड, सद्या रा. गजानन सोसायटी सैदापूर ता. कराड)s हा महावितरण कंपनीत लिपिक पदावर नोकरी करत होता. विश्रामबाग सांगली येथे तो सेवा बजावत होता. रविवारी पाय मुरगळल्याने तो दुपारी घरी झोपला होता. भरदिवसा त्याच्या घरात घुसून संशयितांनी त्याचा निर्घृण खून करत पलायन केले. विजयचा मित्र सदाशिव दोड्डमणी हा विजयच्या घरी आल्यावर त्याला विजय रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दिसले. पोलिसांनी याप्रकरणी तपासासाठी वेगवेगळी पथके  तयार केली आहेत. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संतोष चौधरी यांना तपासाच्या सूचना केल्या. विजयच्या खुनाच्या घटनेनंतर सर्व कुटुंबीय बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी फारशी चौकशी केली नाही. मात्र ज्या परिसरात विजय रहात होता, त्या परिसरातील लोकांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

सोमवारी दिवसभर पोलीस लोकांकडे खुनाच्या घटनेबाबत काही माहिती मिळते का याची पाहणी करत होते. या परिसरात दुपारच्यावेळी फारसा कोणाचा वावर नसतो. त्यामुळे माहितीगार व्यक्तीकडूनच विजयचा काटा काढला गेल्याचा संशय बळावत चालला आहे. त्यानुसार पोलिसांनी या परिसरातील वेगवेगळय़ा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहिम हाती घेतली होती. दिवसभर पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यातच व्यस्त असल्याचे दिसले. विजयच्या कार्यालयातील सहकाऱयांशीही पोलिसांनी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.