|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बहुसंख्य मतदारसंघात बहुरंगी लढत

बहुसंख्य मतदारसंघात बहुरंगी लढत 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव एपीएमसीच्या विविध मतदारसंघात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठय़ा संख्येने उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. हुदली मतदार संघातून महादेवी खनगौड यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतीमाल प्रक्रिया मतदार संघातून मनोज मत्तीकोप्प व कृषीमाल विक्री संघातून प्रमोद बसवंतगौड पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून मंगळवार दि. 3 पासून जाहीर प्रचाराचा नारळ फुटणार आहे. सर्वच मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी पहिल्यापासूनच प्रचाराला सुरुवात केल्याचे समजते.

12 जानेवारी रोजी होणाऱया एपीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासून मोठय़ा संख्येने अर्ज दाखल करण्यात आले होते. बेळगाव एपीएमसीसाठी तब्बल 90 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 32 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

समितीसाठी अनेकांची उमेदवारी मागे

म. ए. समितीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी अनेक उमेदवारांनी स्वयंस्फूर्तीने उमेदवारी मागे घेत आपला पाठिंबा दिला आहे. काकती मतदार संघातून उदय सिद्दण्णावर, भैरू कांबळे व विवेकानंद होनगेकर यांनी तर हुदली मतदार संघातून उषा इराप्पा कलेरी, गुणवंती बडगावी व गौरव्वा मुत्नाळ, सांबरा मतदार संघातून निंगाप्पा पेंढारी, भीमाप्पा बुड्रागोळ, बसवणकुडची मतदार संघातून हणमंत तळवार, नागेश गड्डे, मल्लाप्पा कल्लण्णाचे, महादेव तिगडी, बेळगाव मतदार संघातून अमृत भाकोजी, चंदप्पा कुडचवाड, बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मीबाई कोंडुस्कर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

बेळगुंदी मतदार संघातून मोनाप्पा भास्कळ, पिरनवाडी मतदार संघातून यशवंत  सुधीर नेसरकर, पिराजी मुचंडीकर, भगवान हलगेकर, येळ्ळूर मतदार संघातून आप्पाजी हलगेकर, मनोहर हलगेकर, तानाजी हलगेकर, जोतिबा जुवेकर, तर व्यापारी मतदार संघातून नागेंद्र धर्मोजी, भैरेगौडा पाटील, राज पाटील, विनायक होनगेकर, संभाजी होनगेकर, हेमंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

निवडणूक चिन्हांचे वाटप

अर्ज मागे घेतल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांनी आपापल्या भागात जाऊन शेतकऱयांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांतून समितीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याबरोबरच गावागावांमध्ये बैठकांचे व सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related posts: