|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डेब्रिज माफियांवर कारवाई

डेब्रिज माफियांवर कारवाई 

20 लाखांचा दंड वसूल

नवी मुंबई / प्रतिनिधी

महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने डिसेंबर 2016 पर्यंत शहरातून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक करणाऱया 108 वाहनांवर कारवाई करून 20 लाख 57 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे 2015 सालापेक्षा 2016 सालातील मे महिन्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून डेब्रिजमाफियांचेही धाबे दणाणले होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा यावर्षी डेब्रिज विरोधी यंत्रणा अधिक सतर्क झाल्याने परवाना घेणाऱयांची संख्या यावर्षी दुपटीने वाढल्याने महसुलातही वाढ झाली आहे.

डेब्रिजमाफियांवर कारवाई करण्यासाठी मनपाद्वारे डेब्रिज भरारी पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकाने जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत 108 डंपर अन्य वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून 20 लाख 57 हजार रुपये दंड वसूल केला आहे. मुंबईतील इमारतींचे डेब्रिज टाकण्यासाठी मुंबईत जागा नसल्याने मुंबईलगतच्या विकसित होऊ पाहणाऱया शहरांमध्ये ते टाकण्यात येत आहे. सिडकोतील विकसित पनवेल व उरण क्षेत्रात हे डेब्रिज टाकण्याची कारवाई केली जाते. मात्र, मुंबईतील हे डेब्रिज नवी मुंबईतून जात असताना नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच काही डेब्रिजमाफिया महापालिका क्षेत्रातील एमआयडीसी व शहरातील मोकळय़ा जागांवर तसेच प्रसंगी निर्जन रस्त्यांच्यालगत डेब्रिज टाकून पसार होतात. त्यांना अटकाव करण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.

दरम्यान, नवी मुंबई कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात उरण, पनवेल आदी ठिकाणी डेब्रिज वाहतुकीचा ना हरकत दाखला सुमारे 11 हजार वाहनांना देण्यात आला होता. त्यातून मनपाला 1 कोटी 9 लाख 82 हजार इतके उत्पन्न मिळाले. नवी मुंबई कार्यक्षेत्रात डेब्रिज वाहतुकीचा ना हरकत दाखला 1 हजार 551 जणांना देण्यात आला होता. त्यातून मनपाला 7 लाख 74 हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.