|Thursday, December 13, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हायटेक भिक्षेकरी

हायटेक भिक्षेकरी 

मॉलप्रमाणे किंवा मोठय़ा रुग्णालयांप्रमाणे छोटे दुकानदार डेबिट कार्डने पैसे स्वीकारू लागले, भाजीवाले पेटीएम वगैरे तंत्रज्ञान वापरू लागले अशा बातम्या हल्ली वाचत असतो. आपण अजूनही तंत्रसाक्षर नाही याची खंत आहे. एटीएममध्ये रांगेने जाऊन कार्ड घासायचं, पडद्यावर आलेल्या प्रश्नांची पटापट अचूक उत्तरं द्यायची, समोरच्या खाचेतून पैसे संपल्याची वार्ता देणारी पांढरी चिठ्ठी किंवा मोठय़ा खाचेतून येणारी दोन हजार रुपयांची नोट घेऊन घरी यायचं एवढी सोपी गोष्ट करताना देखील तुमच्या आमच्यातल्या चिमणराव किंवा बेंबटय़ाच्या छातीत धडधड होते. पिन नंबर विसरायला होतं. कधी समोरचा प्रश्न चटकन समजत नाही. रांगेत मागे उभे असलेले लोक ‘आटपा लवकर’ म्हणून ओरडतात, मग आणखीन चुका होतात आणि कार्ड घेऊन लाजेनं काळा निळा चेहरा घेऊन आपण घरी येऊन सांगतो की एटीएममध्ये पैसे संपले. गृहिणी सरकारच्या आणि बँकेच्या नावाने बोटं मोडते.  पण एक दिवस हे चित्र बदलेल. आमच्यासारखे सगळे बेंबटय़ा हायटेक होतील. एखाद्या दिवशी मी देवदर्शनाला जाईन. देवळाबाहेर भिकाऱयांची रांग असेल. भिकारी जमिनीवर न बसता खुर्ची टेबल टाकून बसलेले असतील. टेबलवर लॅपटॉप, कार्ड स्वाईप करण्याचे यंत्र, आणि पेटीएमचा कोड असलेले चित्र असेल. देवळात जाताना आपण ब्लूटूथ ऑन करून गेलं की खिशातल्या मोबाईलवर एकेका भिकाऱयांचे मेसेजेस येतील. दर्शन घेतल्यावर बाहेर पडताना आपण ते वाचून त्यातून भिकाऱयाची निवड केलेली असेल.  त्याच्याकडे गेल्यावर तो माझ्यासमोर लॅपटॉप धरील. त्यावर मी माझा ई-मेल आयडी टाईप करीन. मग  स्क्रीनवर भिक्षेचे दरपत्रक दिसेल. 

मनात असलेली आशीर्वादाची इच्छा            भिक्षेची रक्कम

काही नाही                     रु. 11/  

खडूस बॉसची बदली                     रु. 501/

बायको माहेरी जाणे                      रु.1000/           

उसने पैसे वसुली              मूळ रकमेच्या एक टक्का     आपण पैसे भिकाऱयाच्या खात्यावर जमा केले की त्याने दिलेला आशीर्वाद मला ई-मेलने मिळेल.

चौकात दबा धरून बसणारे वाहतूक पोलीस, उत्सवाची वर्गणी मागणारे कार्यकर्ते वगैरे लवकरच असे हायटेक होतीलच. रिक्षाने प्रवास केल्यावर एकशे अठ्ठय़ाण्णव रुपये बिल झालं की रिक्षावाला मात्र सांगू शकेल की त्याचं स्वाईप मशीन बंद आहे. मी दोनशे रुपये द्यायला हवेत आणि त्याच्याकडे परत देण्यासाठी दोन रुपये सुट्टे नाहीत.

Related posts: