|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रक्तचंदन तस्करीला अनेकांचा फायनान्स

रक्तचंदन तस्करीला अनेकांचा फायनान्स 

प्रतिनिधी/ चिपळूण

येथे कोटय़वधी रूपयांचे रक्तचंदन पकडल्यानंतर अनेक बाबी समोर येत असून या व्यवसायाला अनेक बडय़ा व्यावसायिक व्यक्ती फायनान्स पुरवत होत्या, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ज्यांच्या जागा व इमारतींमध्ये हा साठा सापडला त्यांची वनविभागाने सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी उघड होणार आहेत. मात्र त्यासाठी वनविभागाने त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. यात मुख्य असलेला इसा हळदे याची बँक खाती लवकरच गोठवली जाणार असून पुढील तपासासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

औषधी गुणधर्म असलेल्या आणि परदेशात मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या दुर्मीळ अशा रक्तचंदनाचा शहरातील गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कमधील अलमका इमारतीतील समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीचा गाळय़ात तसेच याच परिसरातील अल्ताफ चिकटे यांच्या मालकीच्या जागेत उभ्या रहात असलेल्या यासीन सलीम मेमन यांच्या अलअब्बास इमारत, मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील भाटकर नामक व्यक्तीच्या जागेत असलेल्या शेडमध्ये टाकलेल्या धाडीत सुमारे दीड कोटी रूपये किंमतीचे 9 टन रक्तचंदन सापडले आहे. मात्र यातील प्रमुख सूत्रधार इसा हळदे हा गायब असल्याने तो सापडल्यानंतर अनेक बाबी पुढे येणार आहेत.

ज्यांच्या जागांमध्ये हा व्यवसाय सुरू होता, त्यांना या बाबतची कल्पना होती की नाही, त्यांना किती रूपये भाडे मिळत होते, त्यांचाही यात सहभाग आहे का, असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले आहेत. त्यामुळे वनविभागाने त्यांची सखोल चौकशी केली तरच खऱया बाबी पुढे येणार आहेत. या तस्करी रॅकेटमध्ये अनेकांचा सहभाग असून अनेक बडय़ा व्यावसायिकांनी यासाठी फायनान्सही केल्याचे बोलले जात आहे. या सर्वच व्यक्ती सध्या शहरातून गायब झाल्या आहेत. त्यांच्या सहभागावर शिक्कामोर्तब होत असून वनविभागाला त्यांचाही शोध घ्यावा लागणार आहे.

वनविभागासमोर मोठे आव्हान

शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. मात्र कारवाई करून कागद रंगवावे लागू नयेत, म्हणून वनविभाग त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे कामात टाळाटाळ करणाऱया वनविभागाने ही सर्वात मोठी धाडसाची कारवाई केली आहे. मात्र सध्या ज्या जोमाने याचा तपास होणे अपेक्षित आहे तितका जोर वनविभागाच्या अधिकाऱयांमध्ये दिसत नाही. याचा मुख्य सूत्रधार इसाला शोधण्यातच त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे यातील टोळीला पकडणे म्हणजे वनविभागासमोर मोठे आव्हानच आहे. त्यामुळे हे आव्हान ते नेमके कसे पेलतात, हे लवकरच दिसून येणार आहे.

अनेकजण धावताहेत अधिकाऱयांच्या मागे

या तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे यातून आपली सुटका व्हावी, म्हणून अशा व्यक्तींचे नातेवाईक सध्या वनविभागाच्या अधिकाऱयांच्या मागे-मागे धावत असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे वनविभाग कोणाला अभय देणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

इसा हळदेची बँक खाती गोठवणार

यातील मुख्य सूत्रधार असलेल्या इसा हळदे याची लवकरच बँक खाती गोठवली जाणार असून सध्या वनविभाग वकिलांच्या माध्यमातून कागदपत्रे तयार करण्यात गुंतला आहे. तसेच पुढील तपासासाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच यात अनेक बडय़ा व्यक्ती सापडण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षांकडून वनाधिकाऱयांचे अभिनंदन

दरम्यान, या चांगल्या कामगिरीबाबत नगराध्यक्षा सौ.सुरेखा खेराडे यांनी मंगळवारी वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱयांचे अभिनंदन केले.

 

Related posts: