|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या विरोधात तक्रार

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या विरोधात तक्रार 

प्रतिनिधी/ काणकोण

गोवा विधानसभेच्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याअगोदरच काणकोण मतदारसंघातील वातावरण तापायला लागले असून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी मणे-खोतीगाव येथे रस्त्यावर आपल्याला अडवून कार्यकर्त्यांकरवी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पुनो वेळीप या व्यक्तीने काणकोणच्या पोलीस स्थानकावर केली आहे. काणकोणच्या पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. मात्र हा आरोप निखालस खोटा असून विरोधी गटाने रचलेले हे षड्यंत्र असल्याचे मंत्री तवडकर यांनी म्हटले आहे.

या प्रकाराचे पडसाद संपूर्ण मतदारसंघात उठले असून माजी आमदार विजय पै खोत यांच्या 100 पेक्षा अधिक समर्थकांनी सरळ काणकोणच्या पोलीस स्थानकावर धाव घेऊन गर्दी केली आणि या प्रकाराची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली. एका लोकप्रतिनिधीने आपल्याच मतदाराला जिवे मारण्याची धमकी देणे ही गंभीर व लज्जास्पद बाब असून ज्या व्यक्तींना पराभव मान्य करण्याची ताकद नाही आणि ज्यांना तोल सांभाळता येत नाही, अशा व्यक्तींनी राजकारणापासून बाजूला राहायला हवे, असे मत पै खोत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आपल्या समर्थकांच्या केसालाही धक्का बसला, तर रस्त्यावर येण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राजकारणात असलेल्या व्यक्तींनी शांततापूर्ण रीतीने निवडणुकीला सामारे जायला हवे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद देसाई यांनी व्यक्त केले, तर तवडकर यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्याची टीका यावेळी शांताजी गावकर यांनी केली. तवडकर यांनी आदिवासी समाजाला गृहित धरू नये, असे मत शाणू वेळीप यांनी व्यक्त केले आणि हा समाज यावेळी विजय पै खोत यांच्याबरोबर असेल असे सांगितले. वरील प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी पुनो वेळीप यांच्याबरोबर मनोहर ना. देसाई ही व्यक्ती उपस्थित होती. त्यांनी जे घडले त्याचा तपशील याप्रसंगी सादर केला.

कपोलकल्पित घटना : तवडकर

दरम्यान, मागच्या पाच वर्षांत काणकोण मतदारसंघातील दंडुकेशाही पूर्णपणे संपुष्टात आलेली असून राजकीय विरोधक पराचा कावळा करून क्रीडामंत्री तवडकर यांना बदनाम करण्याचा तसेच आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काणकोण भाजप मंडळ समितीने केला आहे.

वरील घटना कपोलकल्पित असून ज्या व्यक्तीने आपल्यावर आरोप केलेला आहे त्या व्यक्तीचा मुलगा बलराम निवासी शाळेत शिकत आहे. इयत्ता दहावीत असलेल्या सदर मुलाची अभ्यासातील प्रगती समजून घेण्यासाठी शाळेत येण्याची सूचना देण्यासाठी आपण थांबलो होतो. याचा भलताच अर्थ आपल्या राजकीय विरोधकांनी लावला असल्याचे मत तवडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना मांडले. दरम्यान, काणकोण मतदारसंघात शांतताभंगासारखे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस सतर्क झाले असल्याची माहिती निरीक्षक फिलोमेन कॉस्ता यांनी दिली.

Related posts: