|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोटाबंदी विरोधात नक्षलींच्या कारवाया गतिमान

नोटाबंदी विरोधात नक्षलींच्या कारवाया गतिमान 

  वृत्तसंस्था/ लखनौ

देशात नोटाबंदीने दहशतवादी आणि नक्षलींचा आर्थिक आधारच नष्ट केला आहे. यामुळे बिथरलेले नक्षली आता विविध संघटनांना नोटाबंदी विरोधात संघटीत करत आहेत. नक्षलीं 1000 आणि 500 च्या जुन्या नोटांची वासलात लावण्याची देखील रणनीति बनवत आहेत. यासाठी नक्षली नेते ठेकेदार आणि पंचायत प्रतिनिधींना बंदूकीचा धाक दाखवत आहेत आणि नातेवाईक-जवळच्या सहकाऱयांना ढाल बनवत आहेत.

नोटांची अदला-बदली करून आर्थिक रुपाने मजबूत झालेले नक्षलींची ग्राउंड टीम ‘म्होरक्यां’च्या निर्देशांच्या प्रतीक्षेत आहे. बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशच्या काही भागांमध्ये हालचालींची माहिती मिळताच हेरयंत्रणेच्या केंद्रीय पथकाने सोमवारीच सर्व राज्यांच्या पोलीस मुख्यालयांना सतर्क केले आहे.

नोटाबंदीनंतर झारखंड आणि बिहारमध्ये वरिष्ठ नक्षली नेत्यांना खंडणीची रक्कम नव्या चलनात बदलण्याची जबाबदारी संघटनेकडून सोपविण्यात आली. नक्षली नेते यासाठी आपले नातेवाईक आणि सहकाऱयांच्या खात्यांचा वापर करत आहेत. याशिवाय ठेकेदारांच्या माध्यमातून देखील नोटा बदलविण्यात आल्या. सूत्रानुसार छत्तीसगढमध्ये लोकांच्या खात्यात रक्कम जमा करविण्यात आली.

नव्या सदस्यांकडून खात्यात रक्कम जमा

नक्षली संघटनेत अलिकडेच दाखल झालेल्या नव्या सदस्यांना देखील नोटाबंदीला तोंड देण्यासाठी वापरण्यात आले. त्यांच्या खात्यात रक्कम जमा करविण्यात आली. खात्यात रक्कम जमा केल्यानंतर हे लोक म्होरक्यांच्या निर्देशाच्या प्रतीक्षेत आहेत. नवे सदस्य निर्देश मिळताच खळबळ माजवून नोटाबंदीप्रति नाराजी व्यक्त करू शकतात. याशिवाय नक्षली नेत्यांनी खंडणीची रक्कम ग्रामस्थांमध्ये वाटप करून त्यांच्या खात्यात जमा करविली आहे.

जनधन, पोस्टल खात्यात रक्कम

ओडिशातील कंधमाल-बौद्ध नयागढ प्रांत समितीने 10 नोव्हेंबर रोजी कंधमालच्या बालीगुडा येथे बैठक घेत केंद्र सरकारला इशारा दिला आहे. संघटनेच्या सदस्यांनी ग्रामस्थांची मदत घेत त्यांच्या जनधन आणि पोस्टल बचत खात्यात रक्कम भरली आहे. छत्तीसगढमध्ये जन मिलिसियाच्या लोकांनी ग्रामस्थांचा वापर केला. तर आंध्रप्रदेशमध्ये व्यापाऱयांना हस्तक बनवून नोटा बदलविण्यात आल्या.

सोशल मीडियाचा वापर

सीपीआयने (माओवादी) कमिटी फॉर द रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिजनर, युनायटेड डेमोक्रेटिक प्रंट आणि भगत सिंग-आंबेडकर असोसिएशनने नोटाबंदीनंतर केंद्र सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राइट्सने देखील पत्रके वाटून ग्रामस्थांमध्ये सरकारविरोधात विष पेरण्यास प्रारंभ केला आहे. हे लोक सोशल मीडियावर देखील नोटाबंदीचे नकारात्मक प्रभाव पाठवून लोकांना नोटाबंदी विरोधात एकत्रित करत आहेत.