|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » खासदार बंडोपाध्याय यांची सीबीआयकडून चौकशी

खासदार बंडोपाध्याय यांची सीबीआयकडून चौकशी 

वृत्तसंस्था/ कोलकाता

रोझ व्हॅली चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांची बुधवारी सीबीआयने भुनवेश्वरमध्ये चौकशी केली. त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्याची विनंती सीबीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बुधवारी दुपारी बंडोपाध्याय यांना ओडिशा येथे नेण्यात आले. यावेळी सीबीआय कार्यालयाबाहेर मोठय़ा संख्येने तृणमूलचे कार्यकर्ते उपस्थित होते. तृणमूलच्या नेत्यांवर राजकीय आकसातून कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नेत्यांनी केला. मंगळवारी बंडोपाध्याय यांना सीबीआयने अटक केली होती. यानंतर तृणमूल विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता येथील भाजप कार्यालयावर हल्ला केला होता. भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. दरम्यान, सुदीप यांच्या पत्नी व आमदार नयना बंडोपाध्याय यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या पतीच्या आरोग्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. पश्चिम बंगालचे आरोग्य मंत्री चंद्रमा भट्टाचार्य यांनीही अशाच स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे. सीबीआयच्या तपासामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. वास्तविक रोझ व्हॅली चिटफंड गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस व माकपने सर्वोच्च न्यायालयात केली होती, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ कैलाश विजयवर्गीया यांनी दिली.