|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाचा डाव 538 धावांवर घोषित

ऑस्ट्रेलियाचा डाव 538 धावांवर घोषित 

वृत्तसंस्था./सिडनी

डेव्हिड वॉर्नर व रेनशॉ यांच्यानंतर पीटर हँडस्कॉम्बनेही शानदार शतक झळकावल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 538 धावांवर घोषित केला तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात अझहर अली, युनूस खानच्या नाबाद अर्धशतकांमुळे दिवसअखेर 41 षटकात 2 बाद 126 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियन संघातर्फे वॉर्नर व रेनशॉनंतर पीटर हँडस्कॉम्बने देखील शानदार शतक साजरे केले, ते दिवसातील खेळाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

बुधवारी दिवसाच्या प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने 3 बाद 365 या कालच्या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर 5 गडय़ांच्या बदल्यात त्यात आणखी 173 धावांची भर घातली. यामध्ये पाचव्या स्थानी फलंदाजीला आलेल्या हँडस्कॉम्बच्या शतकाचा प्रामुख्याने समावेश राहिला. त्याने 205 चेंडूंचा सामना करत 9 चौकारांसह 110 धावांचे योगदान दिले. पुढे हँडस्कॉम्ब आश्चर्यकारक पद्धतीने स्वयंचीत झाला तर रेनशॉची शतकी खेळी दिवसातील पहिल्या अर्ध्या तासातच संपुष्टात आली. द्विशतकापासून तो दूरच राहिला. त्याने मध्यमगती गोलंदाज इम्रान खानचा एक चेंडू यष्टीवर ओढवून घेतला होता. त्याने 293 चेंडूत 20 चौकारांच्या मदतीने 184 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने 135 षटकात 8 बाद 538 धावा फलकावर असताना संघाचा पहिला डाव जाहीर केला. पाकिस्तानी संघातर्फे वहाब रियाजने 89 धावात 3 तर अझहर अली (2/70), इम्रान खान (2/111) यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. यासीर शाहने 40 षटकात 1 बळी घेतला. मात्र, यासाठी देखील त्याला 167 धावा मोजाव्या लागल्या.

अझहर, युनूसची नाबाद अर्धशतके

ऑस्ट्रेलियाने आपला डाव 538 धावांवर घोषित केल्यानंतर कसोटी पदार्पणवीर शार्जील खान (4) व बाबर आझम (0) हे आघाडीचे फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर पाकिस्तानची 3.5 षटकातच 2 बाद 6 अशी बिकट अवस्था झाली. मात्र, पुढे अनुभवी युनूस खान (112 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 64) व फॉर्मात असलेला अझहर अली (5 चौकारांसह नाबाद 58) यांनी शानदार, तडफदार अर्धशतके झळकावत तिसऱया गडय़ासाठी 120 धावांची अभेद्य भागीदारी साकारून संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला.

यजमान ऑस्ट्रेलियन संघातर्फे हॅझलवूडने 11 षटकात 32 धावात 2 बळी घेतले. यापूर्वी ब्रिस्बेन व मेलबर्न येथील कसोटी सामन्यांमध्ये लागोपाठ पराभव स्वीकारले असल्याने पाकिस्तानच्या मालिकापराभवावर यापूर्वीच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे, ही कसोटी औपचारिक स्वरुपाची आहे.

अन् शतकवीर पीटर हँडस्कॉम्ब स्वयंचीत झाला!

उजव्या हाताने फलंदाजी करणारा पीटर हँडस्कॉम्ब शतक साजरे केल्यानंतर अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने स्वयंचीत झाला. वहाब रियाजचा चेंडू बॅकफूटवर येऊन कट करण्याच्या प्रयत्नात त्याची बॅट यष्टीच्या अगदी जवळून गेली आणि निव्वळ हवेच्या वेगाने बेल्स पडल्याने त्याला स्वयंचीत होत तंबूत परतावे लागले. त्याने 319 मिनिटांच्या खेळीत 205 चेंडूंचा सामना केला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 135 षटकात 8/538 वर घोषित. (मॅट रेनशॉ 293 चेंडूत 20 चौकारांसह 184, डेव्हिड वॉर्नर 95 चेंडूत 17 चौकारांसह 113, पीटर हँडस्कॉम्ब 205 चेंडूत 9 चौकारांसह 110, मॅथ्यू वेड 33 चेंडूत 29. अवांतर 12. वहाब रियाज 3/89, इम्रान खान 2/111, अझहर अली 2/70, यासीर शाह 1/167)

पाकिस्तान पहिला डाव : 41 षटकात 2/126 (अझहर अली 123 चेंडूत 5 चौकारांसह खेळत आहे 58, युनूस खान 112 चेंडूत 7 चौकारांसह खेळत आहे 64, शार्जील खान 4, बाबर आझम 0. जोश हॅझलवूड 11 षटकात 2/32).