|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » चॅम्पियन्स चषकानंतर ठरवणार भविष्यातील दिशा?

चॅम्पियन्स चषकानंतर ठरवणार भविष्यातील दिशा? 

वनडे व टी-20 क्रिकेटमधून नेतृत्वाचा राजीनामा देत एकच खळबळ उडवणाऱया महेंद्रसिंग धोनीला व्यावसायिक क्रिकेटपासून सातत्याने दूर राहावे लागत असल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला असल्याची चर्चा आहे. सध्या तो केवळ एक खेळाडू म्हणून उपलब्ध होणार असला तरी इंग्लंडमध्ये होणाऱया चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील कामगिरीवर तो 2019 विश्वचषक स्पर्धेपर्यंत खेळणार का, हे स्पष्ट होऊ शकेल, असे मानले जाते.

भारताला 2007 व 2011 साली 2 विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारा धोनी या महिन्यातील तिसऱया आठवडय़ात तब्बल 77 दिवसांच्या कालावधीनंतर एखादी व्यावसायिक लढत खेळेल. नागपूर येथे रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत झारखंड संघाला पाठबळ दर्शवण्यासाठी तो जातीने हजर होता आणि त्याचवेळी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी त्याने भविष्याबाबत प्रदीर्घ चर्चा केली होती.

अर्थात, त्याच्या तंदुरुस्ती व यष्टीरक्षणाच्या दर्जाबाबत अजिबात साशंकता नसली तरी भारतीय संघ अलीकडे कसोटी क्रिकेटच अधिक खेळणार असल्याने तसेच, ताज्या दमाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड फॉर्मात असल्याने त्या पार्श्वभूमीवर धोनीला हा कठीण निर्णय घ्यावा लागला असल्याचे मानले जाते. धोनीच्या या निर्णयामुळे विराट कोहलीला आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघाची नव्याने जडणघडण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लाभेल, हे देखील स्पष्ट आहे.

इशान किशन व ऋषभ पंत यांच्यासारखे फिनिशर्स मोठी मजल मारत असताना दुसरीकडे, स्वतः धोनीला काही सामन्यात गतवैभवाची किंचीतही झलक दाखवता आलेली नव्हता. धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्वाची धुरा विराटकडे असेल, हे निश्चित असून यष्टीरक्षणासाठी केएल राहुल, ऋषभ पंत व किशनसारखे नवे चेहरे शर्यतीत असणार आहेत. अलीकडेच तब्बल आठ वर्षांनंतर कसोटी पुनरागमन करणारा पार्थिव पटेलही शर्यतीत येऊ शकतो.

 

अशी बहरली नेतृत्वाची कारकीर्द

धोनीने 199 वनडेमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व भूषवले असून त्यात तब्बल 110 वेळा विजय संपादन करुन दिला तर 74 सामन्यात पराभव स्वीकारला. 72 टी-20 सामन्यातही त्याने नेतृत्व साकारले असून त्यात 41 विजय व 28 पराभव, अशी त्याची कामगिरी आहे. धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही राहिला असून त्याने 27 विजय, 18 पराभव व 15 अनिर्णीत अशी कामगिरी केली आहे.

कर्णधार या नात्याने त्याने वनडे क्रिकेटमध्ये 54 ची सरासरी व 86 च्या स्ट्राईकरेटने 6633 धावा जमवल्या. टी-20 मध्येही 122.60 च्या स्ट्राईकरेटने त्याने 1112 व कसोटी क्रिकेटमध्ये 40.63 च्या सरासरीने 3454 धावांचे योगदान दिले आहे.