|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ग्रामीण पर्यटनातून 13 गावांचे पालटणार रूपडे

ग्रामीण पर्यटनातून 13 गावांचे पालटणार रूपडे 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हय़ातील पर्यटनाला उभारी देण्यासाठी शासनाकडून ‘ग्रामीण पर्यटन’ विकासासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी जिल्हय़ातील 13 ग्रामीण स्थळांच्या विकासासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे येथे वाढत्या पर्यटनाला चालना देण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या कोकणी हटस्ना नवी उभारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण पर्यटन विकास योजनेतून निसर्गसौदर्यांची उधळण झालेल्या येथील समुद्रकिनारी भागात पर्यटक रिसॉर्ट, वॉटरस्पोर्ट उपक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून पावले उचलण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्हय़ाची ओळख पर्यटनासाठी विशेषत्वाने होत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांचे लक्ष्य जिल्हय़ाकडे वेधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकणात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटकांनी विविध स्थळांना भेटी दिल्या. त्या माध्यमातून येथील पर्यटन विकास महामंडळाला 1 कोटी 75 लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

या ठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने निर्सगाची मोठी उधळण येथील प्रदेशावर झालेली आहे. पण त्या क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची नितांत गरज बनली आहे. या ठिकाणी अनेक प्रसिध्द पर्यटस्थळे आहेत. अलिकडे निसर्ग पर्यटन’ संकल्पना पर्यटकांच्या मनावर बिंबवली जात आहे. दाट जंगले, त्यामधील दऱयाखोऱयात वसलेली खेडी, नारळी, फोफळी, आंबा, काजू, फणसाच्या बागा यांची त्यात आणखीनच भर पडते. समुद्रकिनारे तर येथे येणाऱया पर्यटकांना मन मोहित करून टाकल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे सुट्टीच्या काळात राज्यभरातील व देशभरातील पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे विशेषतः रत्नागिरी जिल्हय़ाकडे वळत आहेत.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिह्यातील बाणकोट, वेळास, लाडघर, कर्धे, वेळणेश्वर, गणेशगुळे, उक्षी, भालावली, देवीहसोळ, साखर, वाडापेठ, गोवळ, भडे अशा गावांचा पर्यटन विकास साधला जाणार आहे. त्या ठिकाणी नवनवीन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. शासनाकडून पर्यटनाबाबत इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या मध्यमातून तेथील ग्रामपंचायतीनाही उत्पन्न मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.