|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे 

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा दावा

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला परवडणारी एक लाख घरे मिळणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरूवारी येथे केला. दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील इमारतीच्या विकासात विकासकाला आता केवळ अधिमूल्य (प्रीमियम) जमा करावे लागेल. विकासकाला गृहसाठा देण्याची गरज नाही, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.

दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडाचा विकास करण्यासाठी तीन चटई क्षेत्र (एफएसआय) दिली जाईल. या निर्णयामुळे कन्नमवारनगर, सहकारनगर, पंतनगर आदी 56 म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती मिळेल, असेही मेहता यांनी सांगितले. मुंबईत म्हाडाच्या एकूण 104 वसाहती आहेत. यापैकी 56 वसाहती या 1970 ते 80 च्या दशकात बांधण्यात आल्या. या इमारती जीर्ण झाल्याने त्यांच्या पुनर्विकासासाठी सरकारने तयार केलेल्या धोरणाची माहिती मेहता यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली.

अधिमूल्य की गृहसाठा या वादात म्हाडा इमारतींचा पुनर्विकास अडकला होता. विकासकांचा गृहसाठा देण्यास विरोध होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन ते चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार एफएसआय देण्यात येईल. यातून म्हाडाला एक लाख घरे उपलब्ध होतील, असे मेहता म्हणाले.

धारावीच्या पुनर्विकासासाठी नवा पर्याय

दरम्यान, धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावी सेक्टर पाचचा विकास म्हाडाच्या माध्यमातून सुरू आहे. इतर सेक्टरसाठी निविदा काढण्यात आली मात्र त्यात अद्याप प्रगती झाली नाही. त्यामुळे धारावीची 12 सेक्टरमध्ये विभागणी करून पुनर्विकास करता येईल काय? याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे प्रकाश मेहता यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘मुंबईतील 85 टक्के भूखंड हे दोन हजार चौरस मीटरपेक्षा कमी आकाराचे आहेत. त्यामुळे बहुतांश म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तातडीने होऊन कन्नमवारनगर, पंतनगर, सहकार आदी 56 वसाहतींना या निर्णयाचा लाभ होईल’

प्रकाश मेहता

गृहनिर्माणमंत्री

Related posts: