|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नरेंद्र मोदी-नितीशकुमारांची एकमेकांवर स्तुतीसुमने

नरेंद्र मोदी-नितीशकुमारांची एकमेकांवर स्तुतीसुमने 

वृत्तसंस्था /पाटणा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. कट्टर शत्रू ‘राजकीय शत्रू’ असणाऱया दोघा नेत्यांची एकमेकांकडे बघण्याचा अचानक बदलेला दृष्टीकोन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

गुरू गोविंदसिंह यांच्या 350 व्या प्रकाशोत्सवानिमित्त नरेंद्र मोदी व नितीशकुमार एका व्यासपीठावर आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्याची हिंमत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दाखवली. आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी एवढे मोठे धाडस केले नव्हते. नितीशकुमारांचा हा निर्णय आदर्शवत असून अन्य राज्यांनीही त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ‘नितीशकुमार मी तुमचे खास अभिनंदन करतो. भावी पिढीला घडविण्याचे काम तुम्ही केले आहे. दारूबंदीच्या निर्णयामुळे बिहारचा विकास वेगाने होईल’, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांच्या कौतुकवर्षावाने सुखावलेल्या नितीशकुमार यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे गुजरातचे 12 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गुजरातमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणीही अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आपल्या देशातील सर्वच राज्यात दारूबंदी झाल्यास देशाचा विकास वेगाने होईल, असा विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार व नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष समोर आला होता. भाजपने मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. यावेळी सर्वप्रथम नितीशकुमार यांनी त्यांच्या नावाला विरोध केला हाता. तसेच भाजपशी युती तोडत लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली होती. तेव्हापासून हे दोन्ही नेते एकमेकांवर टोकाची टीका करत आले आहेत; पण 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. याला सर्वप्रथम नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला होता. नोटाबंदीमुळे देशातील काळापैसा उघड होईल. तसेच भ्रष्टाचाराला चाप बसेल, असा विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला होता. नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करणारे ते पहिले विरोधी पक्ष नेते ठरले होते. यानंतर प्रथमच एका व्यासपीठावर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्याने हा राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे.